पुणे : पुणे उत्पादननिर्मिती केंद्र (मॅन्युफॅक्चरिंग हब) असून, या उत्पादननिर्मिती केंद्राला चालना देण्यासाठी परिसंस्था (इकोसिस्टीम) तयार करण्यात येत आहे. नवी मुंबई डेटा राजधानी असल्याने पुणे आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांना जोडणारे ‘नवोन्मेषी शहर’ (इनोव्हेशन सिटी) उभारण्यात येणार आहे,’ अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे बुधवारी दिली.

देशाला प्रगत उत्पादन क्षेत्रात (ॲडव्हाॅन्स मॅन्युफॅक्चरिंग) पुढे नेताना त्याचे नेतृत्व महाराष्ट्र करेल. त्यासाठी राज्याचे मॅन्युफॅक्चरिंग मिशन सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण केल्या जातील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

नीती आयोगाकडून ‘प्रगत उत्पादन क्षेत्रातील जागतिक नेतृत्वासाठी भारताच्या उत्पादन क्षेत्राचे पुनर्रचना आराखड्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम्, मुख्य आर्थिक सल्लागार डाॅ. प्रवीण परदेशी, नीती आयोगाच्या देबजानी घोष, सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी या वेळी उपस्थित होते.

‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), कम्युटिंग आणि सेमी कंडक्टर या तीन घटकांनी सर्व क्षेत्रांना प्रभावित केले आहे. या क्षेत्रात जागतिक स्पर्धक होत असून, या दृष्टीने महाराष्ट्राला मोठी संधी आहे. नीती आयोगाच्या राष्ट्रीय धोरणाप्रमाणे राज्याचे धोरण तयार करणार आहोत. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या धोरणाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार विकसित भारत आणि महाराष्ट्राचा हा रोडमॅप आहे,’ असे त्यांनी सांगितले.

‘पुणे महत्त्वाचे उत्पादननिर्मिती केंद्र आहे. या केंद्राला चालना देण्यासाठी परिसंस्था शासनाकडून निर्माण केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरला ‘ईव्ही’ची राजधानी करत आहोत. इज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘कृती दल’ (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आले असून, त्याअंतर्गत शंभर सुधारणा केल्या जाणार आहेत. त्याचा प्रत्येक महिन्यातील प्रगतीचा आढावा घेतला जात आहे. इनोव्हेशन सिटीसाठी अनेक उद्योजकांशी चर्चा सुरू आहे, तसेच जागतिक पातळीवरील स्पर्धक कंपन्यांबरोबर चर्चा सुरू आहे.’

नीती आयोगाने जगातील पहिली ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग महाराष्ट्रात स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारने स्वीकारला आहे. या संस्थेद्वारे संशोधन, कौशल्यविकास आणि उद्योग या तिन्ही घटकांना जोडून उत्पादन आणि निर्मिती क्षेत्रात क्रांती घडविण्याचा आमचा मानस आहे. प्रगत उत्पादन आणि निर्मिती मिशनच्या यशात पुण्याची भूमिका निर्णायक ठरणार आहे,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पुण्यात जागतिक दर्जाची ‘ग्लोबल फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट’ उभारण्याचा प्रयत्न आहे. तसेच एड्युसिटी स्थापन करण्यात येत असून, त्यात १२ सर्वोत्कृष्ट जागतिक विद्यापीठे येणार असून, त्यांपैकी ७ विद्यापीठे आली आहेत. इनोव्हेशन सिटी आणि एड्यु सिटीचा एकमेकांना उपयोग होईल.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री