भाजपा खासदार गिरीश बापट यांचं आज दीर्घ आजाराने पुण्यात निधन झालं. त्यांच्या निधनावर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूंकडच्या नेत्यांनी गिरीश बापट यांना आदरांजली वाहिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गिरीश बापट यांचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी गिरीश बापट यांच्यासह घालवलेल्या क्षणांच्या आठवणींना उजाळा दिला.

“पुण्याच्या खाणीतलं अनमोल रत्न”

देवेंद्र फडणवीसांनी गिरश बापट यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते ‘पुण्याच्या खाणीतील अनमोल रत्न’ होते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. “आपण म्हणतो की पुणे ही नररत्नांची खाण आहे. या खाणीतून तयार झालेलं एक अनमोल रत्न म्हणजे आमचे गिरीशभाऊ होते. आमचा अतिशय जवळचा संबंध होता. १५ वर्षं मॅजेस्टिक आमदार निवासामध्ये आम्ही एकत्र राहिलो. गिरीशभाऊ आमच्यासाठी जेवण तयार करायचे. आम्हाला जेवायला घालायचे”, असं म्हणताना देवेंद्र फडणवीस यांना गहिवरून आलं होतं.

“या माणसामध्ये माणसं जपण्याची कला होती. चपराश्यापासून मंत्र्यापर्यंत प्रत्येकाशी त्यांची मैत्री असायची. तेच संबंध त्यांचे प्रत्येकाशी असायचे. बोलण्यात इतके चपखल होते की सभागृहात गिरीशभाऊंचं भाषण किंवा मंत्री म्हणून उत्तर हे इतकं चपखल असायचं की समोरची मंडळी अक्षरश: शांत बसायचे. कुणालाही न दुखवता शालजोडीतले शब्द वापरून आपला मुद्दा पटवून देण्याची त्यांची हातोटी होती”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“गिरीश बापट असताना मी चिंतामुक्त असायचो”

“पुण्याच्या जडणघडणीत त्यांचा वाटा मोठा आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सलग पाच वेळा आमदार, खासदार म्हणून किंवा पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम पुणे कधीच विसरू शकत नाही. गिरीश बापट यांचे पक्षाच्या भिंतींपलीकडचे संबंध होते. सर्व नेत्यांशी, समाजाशी, पक्षांशी त्यांचे संबंध होते. आमच्याबरोबर संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. मुख्यमंत्री म्हणून मी चिंतामुक्त असायचो. दोन्ही सभागृह ते लीलया चालवायचे. कितीही आणीबाणीची परिस्थिती आली तरी बापटसाहेब बरोबर मार्ग काढायचे. विरोधी पक्षालाही शांत करायचे. यातच त्यांचं वेगळेपण होतं”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी गिरीश बापट यांच्या आठवणींना उजाळा दिला.

अष्टपैलू व्यक्तीमत्व…

“अगदी रस्त्यावरच्या माणसालाही आपला वाटेल असा हा माणूस होता. ते रिक्षावाल्याशी गप्पा मारायचे, अजून कुठल्या माणसाशी गप्पा मारायचे. गिरीश बापट शेतकरी होते. त्यांची वडिलोपार्जित जमीन अमरावतीत होती. तिथे जाऊन ते शेतीही करायचे. त्यांचं शेतीवरही प्रेम होतं. अष्टपैलू व्यक्तीमत्व कशाला म्हणतात, हे गिरीश बापट यांच्याकडे पाहून समजायचं”, असं फडणवीसांनी नमूद केलं.

भाजपा खासदार गिरीश बापट यांचं पुण्यात निधन

कृष्णा खोरे महामंडळाचे प्रमुख म्हणून त्यांनी सिंचनाचं केलेलं काम महाराष्ट्रात सोन्याच्या अक्षरांत लिहून ठेवण्यासारखं आहे. ही भाजपाची अपरिमित हानी आहेच. पण राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचीही हानी आहे. कारण असे नेते तयार होण्यासाठी ४०-४० वर्षं लागतात. आम्हाला असं वाटलं नाही की ते ही लढाई हरतील. ते ताकदीनं लढाई लढत होते. आम्ही हरणारे बापटसाहेब पाहिले नव्हते. ते अचानक जातील असं वाटलं नव्हतं. दोन दिवसांतल्या घटना आमच्यासाठीही धक्कादायक होत्या”, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.