scorecardresearch

“किती नेते आले-गेले, संभाजी महाराजांची धर्मवीर उपाधी…” भाजपच्या शहराध्यक्षांची अजित पवारांवर टीका

पुण्यात गोल्फ चौकातील उड्डाणपुलाचे नामकरण ‘धर्मवीर संभाजी महाराज उड्डाणपूल’

“किती नेते आले-गेले, संभाजी महाराजांची धर्मवीर उपाधी…” भाजपच्या शहराध्यक्षांची अजित पवारांवर टीका
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुणे : किती नेते आले-गेले. मात्र, छत्रपती संभाजी राजांची ‘धर्मवीर’, ही उपाधी कोणी पुसू शकला नाही आणि पुसू शकणार नाही, अशा शब्दांत भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली. देश आणि धर्मासाठी बलिदान दिलेल्या संभाजी महाराजांचे स्मरण येणाऱ्या पिढ्यांना होण्यासाठीच गोल्फ चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाला धर्मवीर संभाजी महाराज उड्डाणपूल असे नाव दिले आहे. पुण्यात कोणी ‘दादागिरी’ करू पाहात असेल, तर ती गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मोडून काढतील, असेही मुळीक यांनी या वेळी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. स्वराज्यरक्षक होते, असे विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनात केले होते. त्यावरून वाद निर्माण होऊन राज्यभर अजितदादांच्या विरोधात भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी रान उठविले. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. मात्र, संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षकच म्हणणार हे स्पष्ट केले.

हेही वाचा >>> पुण्याच्या नामांतरावरून अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, “पुणे म्हणजे मिनी…”

या पार्श्वभूमीवर शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना शहराध्यक्ष मुळीक यांनी अजित पवारांवर टीका केली. ते म्हणाले, ‘दररोज रस्त्याने जाता-येता संभाजी महाराजांचे नाव दिसावे. तसेच येणाऱ्या नव्या पिढीला देश आणि धर्मासाठी संभाजी महाराजांनी दिलेल्या बलिदानाची आठवण राहावी, म्हणूनच येरवडा येथील गोल्फ चौकाजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या पूलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल असे नाव दिले आहे.

हेही वाचा >>> “राज ठाकरेंना वैयक्तिक विरोध नाही”, ब्रिजभूषण सिंह यांचं पुण्यात विधान; म्हणाले…

मात्र, संभाजी महाराजांची धर्मवीर ही उपाधी कोणीही पुसू शकत नाही. पुण्यात कोणी ‘दादागिरी’ करू पाहात असेल, तर ती गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मोडून काढतील.’ फडणवीसांकडूनही स्वागत – देश धरम पर मिटने वाला। शेर शिवा का छावा था ।। महापराक्रमी परम प्रतापी। एक ही शंभू राजा था ।। अशा शब्दांत याच कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील उड्डाणपुलाला धर्मवीर संभाजी महाराजांचे नाव दिल्याचे स्वागत केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-01-2023 at 18:02 IST

संबंधित बातम्या