कार्यकर्ते व जनतेशी लोकप्रतिनिधींचा थेट संवाद असला पाहिजे. त्यांच्यात अंतर पडल्याने अनेक प्रस्थापित नेत्यांचे वाटोळे झाले. लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी दलालाची गरज नाही. पुढाऱ्यांना डोक्यावर बसवू नका, त्यांच्या मागे-पुढे पळू नका. हक्काने त्यांना कामे सांगा व ती करवून घ्या, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी रविवारी एका प्रकट मुलाखतीत बोलताना केले.
जुन्नर तालुका मंडळाने शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. अमोल कोल्हे, भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचा सत्कार व प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, तेव्हा ते बोलत होते. मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांचे गुगली प्रश्न, शब्दांची सारवासारव करत सावधपणे दिलेली उत्तरे, दावे-प्रतिदावे व आश्वासने आणि प्रश्नोत्तरातील जुगलबंदीने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतदार झाला. एकमेकांना चिमटे काढण्याची एकही संधी न सोडणाऱ्या तीनही नेत्यांनी जुन्नरचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही जाहीरपणे दिली.
लांडगे म्हणाले,की राजाप्रमाणे वागणाऱ्या राजकारण्यांनी आपण सेवक असल्याचे भान ठेवले पाहिजे. राजकारणाची परिभाषा बदलली असून मतदारही हुशार झाला आहे. विकास खुंटला, कामे झाले नाहीत म्हणून भोसरीत बदल घडला. पराभूत होणाऱ्यांनी त्याविषयी कारणे शोधावीत. पक्षाचे बंधन नसल्याने आपल्याला मोकळे वाटते. कोणाची वाट पहावी लागत नाही. पक्षीय राजकारण आल्यास कुरघोडय़ा होतात. अपक्ष असल्याने सर्वाना आपले काम करता आले, तसेच आपल्यालाही सर्वाना न्याय देता येईल. डॉ. कोल्हे म्हणाले,‘‘उद्धव ठाकरे सुसंस्कृत नेतृत्व असून अभिनेतेपद कायम ठेवून नेतृत्व करण्याची मुभा त्यांनी आपल्याला दिली. विधायक राजकारणी होण्याचे स्वप्न आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्यास भीत नाही. योग्य वेळी लढतीत उतरेन व खऱ्या जेत्याप्रमाणे तलवार म्यानातून बाहेर काढेन.’’ सोनवणे म्हणाले,‘‘जुन्नर राज्यातील सर्वात प्रगतीशील तालुका व्हावा. राज ठाकरे यांच्याशी कायम निष्ठा ठेवणार आहे. राजकीय वारसा नाही, कोणी गॉडफादर नाही. जनतेनेच गॉडफादरची भूमिका बजावली.’’ कार्यक्रमाचे संयोजन रोहित खर्गे, सुहास गटकळ, कैलास आवटी आदींनी केले.
‘सब्र का मीठा फल’
सरकारमध्ये शिवसेना सहभागी होणार का, याविषयी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील. तो निर्णय शिवसैनिकांचा स्वाभिमान कायम ठेवणारा असेल, असे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले. लोकसभेत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, ते शिवसैनिकांच्या परिश्रमामुळे. विधानसभेत शिवसेनेला १९.६९ टक्के मते मिळाली व ६३ आमदार निवडून आले. त्यानुसार सन्मानाची वागणूक अपेक्षित असून ‘सब्र का फल मीठा’ असेल, असे सूचक विधान त्यांनी केले.