पुणे: पौगंडावस्थेतील मुले, त्यांचे सातत्याने बदलणारे भावविश्व, या मुलांचे आपल्याला सगळे माहीत आहे, अशी समजूत करून घेतलेले आणि तरीही अनेक कंगोऱ्यांबद्दल अनभिज्ञच राहणारे त्यांचे पालक आणि या सगळ्यांतून कुटुंबांत, नात्यांत निर्माण होणारे तिढे, अशी निरगाठ सध्या अनेक शहरी कुटुंबे सोडवायचा प्रयत्न करताहेत. हा काही एखाद्या कुटुंबाचा, घराचा प्रश्न नाही. म्हणजे, प्रत्येक प्रश्नाचे कौटुंबिक पातळीवरचे स्वरूप स्वतंत्र, वेगळे असू शकते, पण मध्यमवर्गीय परिसंस्था म्हणून विचार केला, तर पौगंडावस्थेतील मुलांची पालकांना न सुटणारी कोडी हा एक व्यापक प्रश्न सध्या ऐरणीवर आहेच. ‘ॲडोलसन्स’ या मालिकेने दाखविलेली ब्रिटनमध्ये घडणारी काल्पनिक गोष्ट जगभरातील पालकांना थोड्याफार फरकाने आपलीशी वाटावी, इतकी त्या विषयाची व्याप्ती सार्वत्रिक आहे. मराठी नाटकही यात मागे नाही.

किंबहुना ग्रिप्स प्रकल्पांतर्गत पौगंडावस्थेतील मुलांची स्थित्यंतरे टिपणारी, त्या-त्या काळाला सुसंगत अशी अनेक नाटके ग्रिप्स चळवळीने कायमच सादर केली. याच चळवळीच्या मुशीत घडलेली आणि अर्थात, रंगभूमी, चित्रपट, मालिकांत स्वतंत्रपणेही आपला ठसा उमटवलेली अभिनेत्री-लेखिका-दिग्दर्शक विभावरी देशपांडे हिने ‘मानसरंग’ या प्रकल्पांतर्गत लिहिलेले रेनबो अम्ब्रेला फाउंडेशन निर्मित ‘मग तू मला खा’ हे नाटक रंगभूमीवर आणले आहे. कुमारवयीन मुलांच्या भावविश्वात सध्या किती प्रचंड उलथापालथ सुरू आहे, याची एक झलक पाहायची असेल, तर हे नाटक पाहायलाच हवे.

‘मग तू मला खा’ ही रुही आणि हर्ष या ऑनलाइन भेटलेल्या १३ वर्षांच्या मुलांची गोष्ट आहे. म्हणजे, रुहीची म्हणून एक स्वतंत्र गोष्ट आहे आणि हर्षचीही. दोघांमध्ये समान धागा आहे, खाणे. थोड्या स्थूल असलेल्या रुहीला तिच्या चुलत बहिणीच्या लग्नात परिधान करायचा घागरा पोटाचा घेर जास्त असल्याने बसत नाहीये. तो बसण्यासाठी तिला पोटाचा घेर कमी करायचा आहे. परिणामी, तिला ‘डाएटिंग’ करणे अपरिहार्य आहे. तिकडे हर्षला शाळेच्या नाटकात कृष्णाची भूमिका करताना उघड्या अंगाने वावरायचे आहे, पण तो आहे किडकिडीत. त्यामुळे किमान प्रयोगापर्यंत स्नायू फुगवून ‘बळकट’ होण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत.

त्यासाठी मग विविध खाद्यपदार्थ, प्रोटीन पावडरी खाणे सुरू आहे. या सगळ्याचा रुही आणि हर्षवर आलेला ताण आणि तो समजून घेऊ न शकणारे त्यांचे पालक यांची ही गोष्ट. ती एकमेकांना जोडली गेलेली आहे, रुही आणि हर्षच्या ऑनलाइन भेटीतून. त्यातही गंमत अशी, की रुही आणि हर्षचे आभासी अवतार अनुक्रमे झीरो फिगरवाली ‘झिरोबिच’ आणि पीळदार शरीराचा ‘हल्ककट्स’ असे आहेत. म्हणजे, रुही आणि हर्षला जसे व्हावेसे वाटते आहे, तसे त्यांनी स्वत:ला आभासी जगात कल्पिलेले आहे.वयाच्या तेराव्या वर्षी आपल्या ‘दिसण्या’चा इतका विचार या मुलांना करावासा वाटतो, यासाठी आजूबाजूला ‘दिसत’ राहणारी सेलिब्रिटी ठरविली गेलेली माणसे आणि तसे होण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याचा अट्टाहास कारणीभूत ठरतो आहे, याची जाणीव करून देणारी तर ही गोष्ट आहेच. पण, त्याही पलीकडे जाऊन इतर अनेक प्रश्न हे नाटक उपस्थित करते.

हा सगळा जो गोंधळ कुमारवयीन मुलांच्या मनात निर्माण होतो आहे, त्याला मुळात कारणीभूत ठरत असलेली समाज माध्यमे आणि त्यांचे आयुष्यात टाळता न येणारे स्थान, हा तिढा कसा सोडवायचा, हा त्यातील एक कळीचा प्रश्न. तो प्रश्न मुलांनाच काय, पालकांनाही न सुटलेला आहे. नाटकात एव्हरेस्ट बेसच्या ट्रेकला गेलेले हर्षचे वडील हर्षशी व्हिडिओ संवाद साधताना स्वत:च्या ‘दिसण्या’बाबत जागरूक आहेतच, कारण त्यांना त्यांच्या ‘यशा’चे ‘दर्शन’ याच समाज माध्यमांवर करून वाहवा मिळवायची आहे, हे प्रत्यक्ष न बोलताही अध्याहृत आहे.

तिकडे रुहीचे आई-वडीलही घरातील लग्नातल्या ‘संगीत’मध्ये करायच्या नृत्याच्या सरावात स्वत:ला नायक-नायिकेच्या रूपात ‘पाहत’च आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने केलेली ही सातत्याने ‘दिसण्या’ची, ‘दाखविण्या’ची सोय आपल्याला स्वत:च्या आतमध्ये पाहायला उसंतच देत नाहीये. परिणामी, बाह्य जगाचे सातत्याने होणारे दर्शन अंतरंगात न्यूनगंड तेवढा निर्माण करत राहते आहे. ‘बाकीच्यांचे सोड, तुला तू स्वत:ला आवडतेस का,’ हा रुहीच्या आजीने रुहीला केलेला प्रश्न म्हणूनच नाटकाच्या शेवटी शेवटी विवेकी तरंग निर्माण करतो.

हे नाटक वरवर मुलांचे वाटत असले, तरी ते तितकेच या वयातील मुलांच्या पालकांचे, पालकांसाठीचेही आहे. आपल्या मुलांशी, त्यांना जवळीक वाटेल अशा भाषेत संवाद साधणे म्हणजे आपल्याला त्यांचे भावविश्व परिचित आहे, असे मानण्याकडे अलीकडे बऱ्याचशा मध्यमवर्गीय पालकांचा कल दिसतो. एक प्रकारे त्या समजुतीलाही ही गोष्ट प्रश्न विचारते. पाल्याशी होणाऱ्या संवादात त्याने प्रासंगिक मोकळेपणा आला, तरी त्यामुळे संवादातील सकसता वाढतेच असे नाही. ती वाढण्यासाठी आपण आपल्या विश्वातून कधी तरी पूर्णपणे बाहेर यावे लागेल, हे पालकांना समजले आहे काय, हा प्रश्नही महत्त्वाचाच. या प्रश्नाला सामोरे जाताना, पालकांना त्या प्रश्नाला कधी तरी म्हणावे लागेल, ‘लेकाशी-लेकीशी बोलीन, ‘धष्टपुष्ट’ संवाद करीन, मग (प्रश्ना) तू मला कसा खातोस तेच बघतो…’

यांनी नाटक उभे केले आहे

ही कथा रंगभूमीवर आविष्कृत करणारे ऋचा आपटे (रुही), हर्षद राजपाठक (हर्ष), गौतमी आहेर, वेदान्त रानडे, दीप मेहेंदळे, अनन्या रत्नपारखे या कलाकारांचे आणि निर्मिती, संगीत, नृत्यदिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा व इतर तांत्रिक बाजू सांभाळणारे साईराज पाटील, निकेतन नंदुरबारे, ओंकार कानेटकर, सौरभ भालेराव, अनमोल भावे, स्वप्निल कुलकर्णी, इशा कुलकर्णी, आशिष देशपांडे, संकेत पारखे, विराज खटावकर, यश पोतनीस, मृण्मयी कुलकर्णी आदी सर्वांचेच कौतुक. या नाटकाचा प्रयोग १६ मे रोजी सायंकाळी सात वाजता श्रीराम लागू रंग अवकाश येथे, तर १८ मे रोजी सायंकाळी सहा वाजता बॉक्समध्ये होणार आहे.