पुणे: मोठा गाजावाजा करून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून नमो महारोजगार मेळावा बारामती येथे २ आणि ३ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या निमंत्रणावरून वादविवाद झाले होते. तसेच या मेळाव्यात सहभागी झालेल्या काही कंपन्यांची माहिती आंतरजालावर (इंटरनेट) सापडत नाही. तसेच काही कंपन्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली वेगळीच कंपनी दिसून येत आहे. रिक्त जागांमध्ये प्रत्यक्ष नोकऱ्यांऐवजी प्रशिक्षीत पदे भरली जाणार आहेत. मेळाव्यातील जागांचा तक्ता पाहिला, तर यातील जवळपास ३० हजार जागा या नोकऱ्या नसून प्रशिक्षीत (ट्रेनी) पदे आहेत. त्यामुळे या रोजगार मेळाव्यावरच माहिती अधिकार कार्यकर्ते आणि आम आदमी पक्ष महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता या मेळाव्याकडे उमेदवारांनी पाठ फिरविल्याचे समोर आले आहे.
या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यातून ५५ हजार ७२ जणांना रोजगार देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. या मेळाव्यासाठी ३४५ कंपन्यांनी आपल्या रिक्त जागा कळविल्या होत्या. पहिल्या दिवशी १६४, तर दुसऱ्या दिवशी ५८ कंपन्यांनी मेळाव्याला उपस्थिती लावली होती. मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळेल, यामुळे हा मेळावा दोन दिवसांचा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात दोन दिवसांत सुमारे २२ हजार ४८ उमेदवारांनी मेळाव्याला हजेरी लावली. या दोन दिवसीय मेळाव्यातून केवळ साडेबारा हजार जणांनाच रोजगार मिळाला. या मेळाव्याकडे बेरोजगार उमेदवारांनी पाठ फिरविल्याने या मेळाव्याला यथातथाच प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.