पिंपरी : गणेश विसर्जन मिरवणुकीत पुढे जाण्याच्या कारणावरून एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या मंडळातील कार्यकर्त्यांना मारहाण करून जनरेटर आणि टेम्पोचे नुकसान केले. ही घटना मंगळवारी चिखली रुपीनगर येथे घडली. याप्रकरणी दोन्ही मंडळातील २० कार्यकर्त्यांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दक्षता तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीमंत तिरंगा मंडळाचे आठ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरवणूक सुरु असताना आरोपींनी त्यांच्या मंडळाची मिरवणूक पुढे घेण्यावरून वाद घातला. त्यांनी फिर्यादीच्या मंडळातील कार्यकर्त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की केली. तसेच, महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी तयार केलेली मानवी साखळी तोडून आरोपींनी मंडळाच्या जनरेटर ठेवलेल्या छोट्या टेम्पोच्या पुढील काचेवर बुक्की मारून तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याच्या परस्पर विरोधात श्रीमंत तिरंगा मंडळाने फिर्याद दिली. त्यानुसार बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गणेश विसर्जन मिरवणुकीत पुढे जात असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.
मोबाइल घेतल्याच्या रागातून दोघांना मारहाण
मोबाइल परत घेतल्याच्या रागातून दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली.या प्रकरणी शंकर मारुती दारसेवाड (३४, निघोजे) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिलीप देवराव राठोड (४१, निघोजे) आणि सोन्या उर्फ अभिषेक गणपत जगताप (२४, निघोजे) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर यांच्या रुमच्या मागे भांडणाचा आवाज येत होता. ते तिथे गेले असता दिलीप याने शंकर यांचा मोबाईल घेतला होता. तो परत घेतल्याच्या रागातून दोन्ही आरोपींनी शंकर यांना शिवीगाळ केली. दिलीप याने हाताने लाथाबुक्क्यांनी मारले, तर सोन्याने त्याच्याकडील लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या कानाजवळ मारून जखमी केले. हे भांडण सोडवण्यासाठी शेजारी राहणारा व्यक्ती तिथे आला असता आरोपींनी त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
वाहन थांबवण्याचा इशारा करणाऱ्या वाहतूक पोलिसाला ठोकरले
नियमांचे उल्लंघन करत बीआरटी मार्गातून जाणाऱ्या दुचाकी चालकाला थांबण्याचा इशारा करणाऱ्या वाहतूक पोलिसाला धडक देऊन जखमी केले. ही घटना मंगळवारी नाशिक फाटा येथील बीआरटी मार्गावर घडली.
याबाबत पोलीस शिपाई विलास केकान यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केकान हे भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ते मंगळवारी दुपारी नाशिक फाटा येथे वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी एक दुचाकी बीआरटी मार्गातून आली. बीआरटी मार्गात खासगी वाहनांना प्रवेश नसल्याने त्या वाहनाला थांबण्याचा केकान यांनी इशारा केला. मात्र आरोपी दुचाकी चालक न थांबता त्याने केकान यांना धडक दिली आणि पळून गेला. दरम्यान या अपघातात केकान यांच्याकडील सरकारी ई चलन मशीन रस्त्यावर पडल्याने तिचे नुकसान झाले. दापोडी पोलीस तपास करत आहेत.
तडीपार गुंडाला पिस्तुलासह अटक
पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला एक आरोपी पिस्तूल आणि काडतुसे बाळगताना पोलिसांना आढळला. ही कारवाई बुधवारी (३ सप्टेंबर) दुपारी पिंपळे गुरव येथे महाराजा हॉटेलच्या पाठीमागे मोकळ्या जागेत करण्यात आली. व्यंकटेश राजेंद्र भोसले (३३, पिंपळे गुरव) या आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी आशिष बनकर यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यंकटेश भोसले याला डिसेंबर २०२४ मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. त्याने स्वतःकडे पिस्तूल बाळगले. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून ३१ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सांगवी पोलीस तपास करत आहेत.