पुणे : ऑनलाइन आणि दूरशिक्षणाद्वारे पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नव्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. दूरशिक्षण आणि ऑनलाइन पदवीला यूजीसीकडून पारंपरिक पदवीची समकक्षता देण्यात आली असून, या निर्णयामुळे येत्या काळात दूरशिक्षण, ऑनलाइन पदवी, पदव्युत्तर, पदविका अभ्यासक्रमांच्या प्रतिसादात वाढ होऊ शकेल.

हेही वाचा <<<विकासकाकडून शेतकऱ्याची तीन कोटींची फसवणूक; हिंजवडीत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

हेही वाचा<<<मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी; दोन ठिकाणी भिंत कोसळण्याच्या घटना

यूजीसीचे सचिव प्रा. रजशीन जैन यांनी या संदर्भात परिपत्रक नुकतेच संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. दूरशिक्षण अभ्यासक्रम नियमावली २२ अंतर्गत यूजीसीने मान्यताप्राप्त संस्थांमधून दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षणाद्वारे प्राप्त केलेली पदवी ही पारंपारिक पद्धतीने प्रदान केलेल्या पदवीला समकक्ष असल्याबाबतचा निर्णय यूजीसीच्या मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रम आणि ऑनलाइन अभ्यासक्रम नियमावली २०२२ च्या नियम २२ नुसार घेण्यात आला. यूजीसीच्या २०१४मधील पदवीच्या अधिकृततेसंदर्भातील अधिसूचना, यूजीसीशी संलग्न उच्च शिक्षण संस्थांद्वारे दूरशिक्षण आणि ऑनलाइन पद्धतीने घेतलेल्या पदवीपूर्व आणि पदव्युत्तर स्तरावरील पदवी, पदविकांना मान्यता देण्यात आली आहे. आता दूरशिक्षण आणि ऑनलाइन पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका पारंपरिक पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका यांना समकक्ष असतील, असे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा<<<अपुऱ्या सोयीसुविधांच्या निषेधार्थ पिंपरीत रहिवाशांचे आंदोलन

करोना काळात ऑनलाइन आणि दूरशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये वाढ झाली. आता यूजीसीच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा ऑनलाइन, दूरशिक्षण अभ्यासक्रमांकडे असलेला कल कायम राहू शकेल. यूजीसीने या पूर्वीच्या परिपत्रकांतून काही पदवी अभ्यासक्रमांना आवश्यक असलेला क्षेत्र अनुभवाचा तपशील स्पष्ट केला आहे. तसेच दूरशिक्षण आणि ऑनलाइन कोणते अभ्यासक्रम राबवता येतील, कोणते राबवता येणार नाहीत हेही काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. त्यानुसार दूरशिक्षण आणि ऑनलाइन पद्धतीने अभियांत्रिकी, वैद्यकीय, फिजिओथेरपी असे काही अभ्यासक्रम राबवता येणार नसल्याचेही यूसीसीने नमूद केले आहे. काही शिक्षण संस्था यूजीसीची मान्यता न घेताच परस्पर दूरशिक्षण आणि ऑनलाइन अभ्यासक्रम राबवत असल्याचे निदर्शनास आले असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे.

येत्या काळात वर्गातील शिक्षणाइतकेच महत्त्व ऑनलाइन आणि दूरशिक्षणालाही येणार आहे. तसेच नव्या शैक्षणिक धोरणामध्ये असलेली लवचिकता लक्षात घेऊन ऑनलाइन आणि दूरशिक्षण पदवीला पारंपरिक पदवीची समकक्षता देण्याचा यूजीसीचा निर्णय स्वागतार्ह आहे.

– डॉ. माणिकराव साळुंखे, कुलगुरू, भारती विद्यापीठ विश्वविद्यालय