स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महापालिकेकडून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पाच लाख तिरंग्यांचे विनामूल्य वाटप केले जाणार आहे. क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ३०० केंद्रही त्यासाठी करण्यात आली आहेत.
देशाला स्वातंत्र मिळालेल्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामाध्यमातून विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत महापालिकेकडूनही हर घर तिरंगा उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधी हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी पाच लाख झेंड्यांची खरेदी महापालिका करणार आहे. खरेदी केलेल्या झेंड्यांचे नागरिकांना विनामूल्य वाटप केले जाणार आहे.
महापालिककेड टप्प्याटप्याने झेंडे उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार वाटपाचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून झेंड्यांचे वितरण करण्यासाठी तीनशे केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्याद्वारेही वाटप केले जाईल.
