पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील मतदारयाद्यांमध्ये घोळ असल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून होत असताना, जिल्ह्यात एक जुलैनंतर नव्याने किती मतदारनोंदणी झाली, याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली आहे. या संदर्भातील नोंद पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषदेकडे असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगितले जात आहे, तर ही माहिती निवडणूक शाखेकडेच असल्याचा दावा महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुका चार महिन्यांत घ्याव्यात, असा आदेश मे महिन्यात दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली. त्यानुसार मतदारयादी अंतिम करण्याचे काम सध्या सुरू असून, राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एक जुलै रोजी अंतिम असलेली मतदारयादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

जिल्ह्यात एक जुलैनंतर किती नव्या मतदारांनी नोंदणी केली, असा प्रश्न उपस्थित केला असता, त्याबाबत मात्र ठोस उत्तर मिळत नसल्याची स्थिती आहे. यासंदर्भात जिल्हा निवडणूक शाखेकडे विचारणा केली असता, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, तसेच जिल्हा परिषदांकडे ही माहिती असेल, असे सांगण्यात आले. तर, जिल्हा प्रशासनाचा हा दावा महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी खोडून काढला.

निवडणुकीसाठीच्या मतदारयाद्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा परिषदेकडे देण्यात आल्या आहेत. एक जुलैनंतर किती मतदार नोंदणी झाली, याची माहिती त्यांच्याकडेच उपलब्ध असेल. मीनल कळसकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी

एक जुलैनंतर नोंदविलेल्या मतदारांची माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेकडे त्याची नोंद असेल. अविनाश शिंदे उपजिल्हाधिकारी व सहायक निवडणूक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

एक जुलैनंतर किती मतदारनोंदणी झाली, याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडे असेल. महापालिकेकडे ती नाही. दर तीन महिन्यांनी जिल्हा प्रशासनाकडून त्याची माहिती सादर केली जाते. प्रसाद काटकर, सहायक निवडणूक आयुक्त, पुणे महापालिका

जिल्हा परिषदेसाठीच्या निवडणुकीची यादी तालुकास्तरावर पाठविण्यात आली आहे. नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांची माहिती जिल्हा परिषदेकडे नाही. ती जिल्हा निवडणूक शाखेकडे असेल. चारुशीला देशमुख-मोहिते समन्वय अधिकारी, जिल्हा परिषद