लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : महापालिकेच्या विविध विभागाकडील दहा हजार कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. कंत्राटी कामगारांना बोनस मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रीज मजदूर संघटनेकडून उपोषण सुरू करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ठेकेदारांकडून हा बोनस दिला जाणार आहे.
महापालिकेतील कंत्राटी कामगार अधिनियम १९७१ नुसार दिवाळी बोनस द्यावा लागतो. मात्र तो दिला जात नसल्याने राष्ट्रीय मजदूर संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू करण्यात आले होते. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी कामगार विभागाचे अतिरिक्त कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी दूरध्वनीद्वारे सुनील शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार आणि उपायुक्त माधव जगताप तसेच मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांच्या सोबत बैठक झाली होती. कंत्राटी कामगारांना बोनस देण्यासंदर्भात कामगार उपायुक्तांनी पत्र दिले होते. त्यानंतर कंत्राटी कामगारांना ठेकेदारांनी बोनस देण्याबाबतचे परिपत्रक महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आले.
आणखी वाचा-‘संवेदनशीलता दाखवा, एसटीची दरवाढ मागे घ्या,’ आमदार रवींद्र धंगेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ठेकेदाराकडून बोनस देण्यास विलंब झाल्यास महापालिका प्रशासन ठेकेदाराऐवजी बोनस देईल आणि ही रक्कम त्यांच्या देयकातून वळती करून घेतली जाणार आहे. त्यामुळे दहा हजार कंत्राटी कामगारांची दिवाळी गोड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.