पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी अखेर गोड झाली आहे. या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून मानधन मिळाले नव्हते. या कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे मानधन थकित असल्याने त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या घरासमोर दिवाळीत लाडू, करंजी मागण्याचे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर अखेर सोमवारी सकाळी त्यांचे थकित मानधन मिळाले आहे.
राज्यभरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ५० हजारांवर अधिकारी आणि कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असून, त्यामध्ये पुण्यात सुमारे अडीच हजार कर्मचारी आहेत. या अभियानांतर्गत नवीन ई-स्पर्श प्रणाली कार्यरत करण्याची कार्यवाही राज्य स्तरावरून सुरू आहे. मात्र, ही संगणक प्रणाली दिवाळीपर्यंत कार्यान्वित होणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने राज्यभरात अभियानातील कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट आणि सप्टेंबरचे मानधन थकित होते. मानधन नसल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार होती. यामुळे कर्मचाऱ्याऱ्यांनी थकीत मानधन दिवाळीपूर्वी मिळावे, अशी मागणी केली होती. अखेर दोन्ही महिन्यांचे थकित मानधन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर सोमवारी सकाळी जमा झाले.
आयुक्तांना पत्र
या प्रकरणी राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीने आरोग्य सेवा आयुक्तांना पत्र दिले होते. याबाबत समितीचे राज्य समन्वयक विजय गायकवाड यांनी म्हटले होते की, अभियानातील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मानधन मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यात १५ व्या वित्त आयोगामध्ये पुरेसा निधी शिल्लक आहे. कर्मचाऱ्यांवर दिवाळी सण साजरा करण्यासोबतच बँकांचे कर्जाचे हप्ते, घरगुती खर्च आणि शैक्षणिक खर्चाची जबाबदारी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या थकित मानधनासाठी १५ वा वित्त आयोग अथवा जिल्हा स्तरावर असणारा अखर्चित निधी वापरण्यास परवानगी द्यावी.
मानधनात ९ ऑक्टोबरला वाढ
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी नुकताच २३ दिवसांचा संप केला होता. सरकारने १४ मार्च २०२४ रोजी झालेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, यासाठी १९ ऑगस्टपासून एनएचएमच्या राज्यभरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद केले होते. या आरोग्य सेवेतील १६ संघटनांनी एकत्रित येऊन भाग घेतला होता. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर १० सप्टेंबरला हा संप मागे घेण्यात आला होता. यानंतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय ९ ऑक्टोबरला शासनाने घेतला.
कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानंतर आरोग्य विभागाने मानधनात वाढ केली. परंतु, कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांचे वेतन मिळालेले नव्हते. मानधन वाढीआधी आमचे थकित वेतन दिवाळीपूर्वी द्यावे, अशी आमची मागणी होती. अखेर आमचे दोन महिन्यांचे मानधन आज मिळाले आहे.– हर्षल रणवरे, माजी अध्यक्ष, एनएचएम कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य