पुणे महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाण्याच्या टाक्या उभारण्याची कामे नव्या वर्षात मेअखेरीस पूर्ण होतील. त्यानंतर महापालिकेच्या पाणीवितरणात होणारी गळती कमी होईल. परिणामी पाण्याची मागणी आपोआप कमी होईल. त्यामुळे ही कामे होईपर्यंत जास्त पाणी वापराबाबत तक्रार करू नका, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जलसंपदा विभागाला गुरुवारी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पुण्यात पथदिव्यांच्या खांबांना दोन कोटींची ‘झळाळी’; जी-२० परिषदेच्या निमित्ताने पथदिव्यांची रंगरंगोटी

विधानभवन येथे शहरातील पाणीपुरवठा प्रश्नाबाबत बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम सुरू आहे. या टाक्या नव्या वर्षात मेअखेरपर्यंत बांधून पूर्ण होतील. त्यामुळे महापालिकेच्या पाणीवितरणात असलेली पाण्याची गळती आपोआप कमी होईल. परिणामी महापालिकेची पाण्याची मागणी देखील कमी होणार आहे. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे महापालिका जास्त पाणी वापरते, याबाबत जलसंपदा विभागाने तक्रार करू नये, अशी सूचना केली आहे. शहर आणि ग्रामीण भागाला समन्यायी पाणीवाटप केले जाईल.

हेही वाचा- संशोधन संस्थेतील प्रसाधनगृहात युवतीचे मोबाइलवर चित्रीकरणाचा प्रयत्न; पसार आरोपीचा शोध सुरू

समान पाणीपुरवठा योजनेची कामे शहरात जलदगतीने सुरू आहेत. त्या अंतर्गत पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम पूर्ण होत आले आहे. वारजे जलकेंद्र येथील पाणी उचलण्याचे पंप बदलण्याचे काम सुरू असून येत्या दोन महिन्यांत हे कामही पूर्णत्वास जाईल. त्यामुळे या केंद्रांतर्गत येणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. चांदणी चौक परिसरात अडीच किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) आणि संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या (डिफेन्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन – डीआरडीओ) उच्च ऊर्जा सामुग्री संशोधन प्रयोगशाळेकडून (हाय एक्स्पोसिव्ह मटेरियल ॲण्ड रिसर्च इंजिनिअरिंग – एचईएमआरएल) परवानगी नुकतीच मिळाली आहे. त्यामुळे या अडीच कि.मी. जलवाहिनीचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे बैठकीनंतर महापालिकेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

हेही वाचा- ‘घाशीराम कोतवाल’चा मूळ संचातील दुर्मीळ प्रयोग आजपासून यूटय़ूबवर 

बाणेर, बालेवाडीतील पाणीपुरवठा सुरळीत ठेवा

बाणेर व बालेवाडी येथील नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी परिसरातील पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी महापालिकेला दिल्या. बाणेर, बालेवाडी परिसरातील नागरिकांना जलवाहिनीद्वारे ४६ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. हा पाणीपुरवठा सुरळीत राहण्याच्यादृष्टीने दक्षता घ्यावी. बालेवाडी जकातनाका, पाषाण-बाणेर लिंक मार्ग यांच्यासह पाण्याच्या टाकीची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी केल्या. वारजे जलकेंद्र ते बालेवाडी एकूण १८.९४ किलोमीटर लांबीची जलवाहिनी नियोजित असून त्यापैकी १६.७२ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच जुने खराब झालेले पंप बदलून त्याजागी वाढीव क्षमेतेचे नवीन पाईप बसविण्यात येत असून येत्या ६ महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont complain about punes water consumption guardian minister chandrakant patils order to the water resources department pune print news psg 17 dpj
First published on: 16-12-2022 at 12:02 IST