पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) मंजूर आराखड्यापैकी ९०० कोटींच्या कामांना मान्यता मिळाली असून, त्यापैकी ६०० कोटी रुपयांच्या कामांसाठीचे कार्यादेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्याच्या विविध भागांत माॅडेल स्कूल आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे येत्या काही दिवसांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत.
जिल्हा नियोजन समितीकडून १ हजार ४०० कोटींचा वार्षिक आराखडा करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यामध्ये जिल्ह्यातील ३०३ आदर्श शाळा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, १०८ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. त्याशिवाय शिक्षण, आरोग्यासाठी प्रत्येकी १०० कोटी, बंधारे तलाव दुरुस्तीसाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली असून, ग्रामीण रस्ते, जिल्हा मार्ग होणार आहेत.
जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकषांनुसार निधी खर्च करण्यात येणार आहे. यातील नऊशे कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत या कामांच्या टप्याटप्याने निविदा काढून त्याचे कार्यादेश देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. मात्र, जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या कामांना विलंब झाला आहे. त्यामुळे कामेही डिसेंबरनंतर पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंजूर करण्यात आलेल्या कामांपैकी जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील कामांचा सर्वाधिक समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व ६०० कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे या कामांना सुमारे ३५० कोटी रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय, जिल्हा रुग्णालयासाठी यापूर्वीच तीन कोटी रुपयांची औषधे खरेदी करण्यात आली आहेत. नागरी सुविधा, जन सुविधांतील कामांमध्ये रस्ते, गटार, ग्रामपंचायत इमारती, स्मशानभूमी बांधकाम यांसारख्या कामांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.