पुणे : खासगी रुग्णालयातील किडनी रॅकेट प्रकरणात ससून रुग्णालयातील डाॅ. अजय तावरे हाही गुंतलेला असून, त्याला या प्रकरणात सहआरोपी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी दिली.

डाॅ. तावरे याच्याविरुद्ध कल्याणीनगर अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात डाॅ. तावरे न्यायालयीन कोठडीत असून, सध्या तो येरवडा कारागृहात आहे. ‘किडनी रॅकेट प्रकरणात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात चौकशी समिती नेमण्यात आली होती. निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात आली. तेव्हा डाॅ. तावरे या प्रकरणात सामील असल्याचे उघडकीस आले. आता या प्रकरणात डाॅ. तावरेला सहआरोपी करण्यात येणार आहे,’ असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

चौकशी समितीने याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला होता. या प्रकरणात खासगी रुग्णालयामधील वैद्यकीय तज्ज्ञ, किडनी दाता, दलाल, तसेच रुग्णाविरुद्ध अशा १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डाॅ. संजोग सीताराम कदम यांनी फिर्याद दिली होती.

प्रकरण नेमके काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका रुग्णाच्या किडनी प्रत्यारोपणावेळी पैशांच्या देवघेवीवरून पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, तेव्हा किडनी रॅकेट उजेडात आले. कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा सखोल तपास करताना जुन्या गुन्ह्यांचा निपटारा करतेवेळी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या किडनी रॅकेट प्रकरणातील कागदपत्रांची पाहणी करण्यात आली, तेव्हा डाॅ. तावरे याने या प्रकरणातून सुटण्यासाठी प्रयत्न केल्याचे आढळून आले. तेव्हा डाॅ. तावरे याचा किडनी प्रत्यारोपण प्रकरणात सहभाग असल्याचे उघडकीस आले. तो प्रत्यारोपणविषयक काम करणाऱ्या समितीचा अध्यक्ष होता. या समितीत आठ सदस्यांचा समावेश होता.