पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना राज्य सरकारने पदमुक्त केले, त्याच दिवशी त्यांच्या मुलाने राजीनामा दिल्याची बाब आता समोर आली आहे. विशेष म्हणजे डॉ. ठाकूर यांनी त्याच दिवशी हा राजीनामा मंजूर केला होता. त्यामुळे या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा सूत्रधार ललित पाटील याने पलायन केल्याप्रकरणी चौकशी समितीने डॉ. ठाकूर यांच्यावर ठपका ठेवला होता. त्यानंतर राज्य सरकारने १० नोव्हेंबरला डॉ. ठाकूर यांना पदमुक्त केले तर अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ. प्रवीण देवकाते यांना निलंबित केले. याच दिवशी डॉ. ठाकूर यांचे पुत्र डॉ. अमेय ठाकूर यांनी सहायक प्राध्यापकपदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे, त्याचदिवशी खुद्द डॉ. ठाकूर यांनी तो राजीनामा मंजूर केल्याची बाब समोर आली आहे.

आणखी वाचा-राज्य सरकार होणार मालामाल; आणली ‘ही’ योजना

डॉ. अमेय ठाकूर हे कंत्राटी पद्धतीने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांचे कंत्राट हे १२० दिवसांच्या कालावधीचे होते. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा १२० दिवसांचे कंत्राटाचे नूतनीकरण करण्यात येत होते. डॉ. ठाकूर हे यंदा फेब्रुवारी महिन्यात सोलापूरमधील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून बदली होऊन ससूनमध्ये आले. त्यावेळी डॉ. अमेय ठाकूरही सोलापूरमधील महाविद्यालयातून ससूनमध्ये रूजू झाले.

डॉ. अमेय ठाकूर यांना मासिक सुमारे ८० ते ९० हजार रुपये वेतन होते. ते कंत्राटी पद्धतीने कार्यरत असल्याने त्यांना नोटीस कालावधीही नव्हता. डॉ. ठाकूर यांनी मुलाला बदलीच्या ठिकाणी प्रत्येक वेळी सोबत नेऊन तिथे रूजू केले होते. याचबरोबर डॉ. अमेय यांना झुकते माप देऊन इतर डॉक्टरांना डावलले जात असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. डॉ. अमेय यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्व अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आणखी वाचा-पुणे मेट्रोला दिवाळीचा असाही फटका! प्रवासी अन् उत्पन्नातही मोठी घसरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजीनामा देण्याच्या वेळेबाबत प्रश्नचिन्ह

डॉ. संजीव ठाकूर यांनी मुलाचा राजीनामा १० नोव्हेंबरला मंजूर केला. त्याचदिवशी डॉ. अमेय यांनी राजीनामा दिला होता. डॉ. ठाकूर यांनी पदमुक्तीच्या आदेशानंतर तो राजीनामा मंजूर केला का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. याचबरोबर पदमुक्तीच्या आदेशाआधी राजीनामा मंजूर केला असेल तर कारवाईची कुणकुण डॉ. ठाकूर यांना आधीच लागली होती का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.