मधमाशी संशोधक डॉ. लक्ष्मी राव यांचे संशोधन
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच काश्मीर ते कन्याकुमारी असे देशी फुलोऱ्याचे वेळापत्रक (फ्लोरल कॅलेंडर) तयार होत आहे. मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या सहायक संचालक डॉ. लक्ष्मी राव यांनी गेली चार वर्षे देशभर फिरून मधमाश्यांच्या आवडीच्या फुलोऱ्याचे संशोधन केले असून, राज्यनिहाय फुलोऱ्याच्या वेळापत्रकाची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे.
निसर्गचक्रातील परागीभवनाच्या प्रक्रियेत मधमाश्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मधमाश्या फिरून फुलांमधून मकरंद गोळा करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी फुलोऱ्याचा काळ महत्त्वाचा असतो. त्यासाठी शेतीतील पीक पद्धतीची माहिती गोळा करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यत किती एकरांमध्ये शेती केली जाते, त्यात कोणती पिके घेतली जातात, कोणत्या फळांचे उत्पादन होते, पेरणी किंवा लागवड कधी केली जाते, पिकांना फुले कधी येतात, ती किती काळ टिकतात याची माहिती घेण्यात आली. तसेच देशी मधमाश्यांसाठी उपयुक्त असलेल्या झाडांची, फुलांची माहिती वनखात्याकडून घेण्यात आली. या माहितीचे संकलन करून प्रत्येक महिन्यानुसार पिके, फलोत्पादन, जंगलातील फुलोऱ्याचे वेळापत्रक करण्यात आले. या फुलोऱ्याच्या काळात त्या ठिकाणी मधमाश्यांच्या पेटय़ा ठेवल्यास मकरंद गोळा करणे मधमाश्यांसाठी सोयीचे ठरेल, अशी माहिती डॉ. लक्ष्मी राव यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने २०१३ मध्ये डॉ. राव यांना या संशोधनासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्या आधारे त्यांनी चार वर्षे देशभरातील जंगले, शेतांमध्ये फिरून माहितीचे संकलन, विश्लेषण केले. संपूर्ण देशातील फुलोऱ्याचे वेळापत्रक तयार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे डॉ. राव यांनी सांगितले.
‘या पूर्वी महाबळेश्वर, भीमाशंकर अशा काही ठिकाणी अभ्यास करून स्वतंत्र वेळापत्रके तयार करण्यात आली होती. मात्र, देशाचे वेळापत्रक पहिल्यांदाच तयार होत आहे. हे वेळापत्रक तयार करण्यासाठी वनस्पतिशास्त्र, शेती, हवामान अशा विषयांची माहिती असणे गरजेचे होते. त्यामुळे या प्रकल्पासाठी वेळ देऊन, माहिती समजून घेत काम केले. उत्तर प्रदेश आणि पूर्वोत्तर राज्यांचे काही काम बाकी आहे. काही महिन्यांत प्रकल्प पूर्ण होईल. हे आव्हानात्मक काम पूर्ण होत आल्याचा आनंद आहे, असे त्या म्हणाल्या.
मधाचे उत्पादन वाढण्यासाठी उपयुक्त
देशातील मधाचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘फ्लोरल कॅलेंडर’ उपयुक्त ठरेल. कोणत्या भागात फुलोरा जास्त आहे, त्यानुसार फुलोऱ्याच्या काळात मधपेटय़ा ठेवल्यास मधमाश्यांना मकरंद गोळा करता येईल आणि त्याद्वारे देशातील मधाचे उत्पादन वाढवणे शक्य होईल. प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्राचे कॅलेंडर तयार करून त्यानुसार मधपेटय़ा ठेवण्यात आल्यानंतर मधाच्या उत्पादनात वाढ झाल्याचे डॉ. राव यांनी सांगितले.
बदलत्या पीक पद्धतीचा फटका
देशभरातील शेतीमध्ये सातत्याने बदलणाऱ्या पीक पद्धतीचा फटका मधमाश्यांना बसत असल्याची डॉ. राव यांना चिंता आहे. पीक पद्धतींमधील बदलांमुळे खते बदलतात. त्यामुळे मधमाश्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतो. परिणामी, मध उत्पादनावरही त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.