पुणे : समाज ठरवतो तेव्हा सरकारपेक्षा शंभर पट काम करू शकतो. त्यामुळे नदी पुनरुज्जीवनासाठी सरकारवर अवलंबून न राहता समाजाने पुढाकार घ्यायला हवा, असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी सोमवारी (२८ मार्च) व्यक्त केले. फर्ग्युसन महाविद्यालय, जलबिरादरी, वनराई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, म. फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नदी की पाठशाला’ या अभ्यासक्रमाचे उद्घाटन राजेंद्रसिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

कुलगुरु डॉ. नितीन करमळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, कृषी विद्यापीठाचे कुलगुरु सुनील भासाळकर, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, सुमंत पांडे, अमित वाडेकर या वेळी उपस्थित होते.

राजेंद्रसिंह म्हणाले, “उगमापासून विविध टप्पे समजावून घेत नदी प्रदूषित होणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नदीच्या जीवनाला आपल्या जीवनाबरोबर जोडून ती आरोग्यसंपन्न केली पाहिजे. आमच्या पिढीने नदीची दुरवस्था केली आहे. पृथ्वी, निसर्ग आणि मानवाने एकमेकाचा आदर केला नाही तर जीवन राहणार नाही. केवळ तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीमुळे विकास होणार नाही. आपण व्यवहाराने निसर्ग वाचविला पाहिजे. भावी पिढीने जल साक्षरतेची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यासाठी विविध विभागातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक दिवशी नदीबरोबरचे नाते दृढ करण्याची चळवळ उभी केली पाहिजे.”

हेही वाचा : विश्लेषण : अंटार्क्टिका का तापतोय? तापमानवाढीने संशोधकही बुचकळ्यात!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. करमळकर म्हणाले, “प्रत्येक महाविद्यालयाने राम नदीसारख्या छोट्या नद्यांची जबाबदारी स्वीकारली तर पुढील पाच ते दहा वर्षांत नद्यांचे पुनरुज्जीवन होऊ शकेल. या उपक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचाही सक्रिय सहभाग राहील.”