पुणे : महायुतीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले) सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसल्याचे सांगत माजी उपमहापौर, रिपाइंचे नेते डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि रिपाइंचे शहराध्यक्ष संजय सोनावणे यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे. डाॅ. धेंडे यांच्या राजीनाम्यामुळे वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत असून रिपाइंसाठीही हा धक्का आहे.

‘आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षामध्ये गेली २७ वर्ष कार्य करत आहे. आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासह राजकीय पदाचा उपयोग करून समाजाला न्याय देण्याच्या कामात पुढाकार घेतला. पक्षाच्या धोरणानुसार विविध राजकीय भूमिकेला नेहमीच समर्थन दिलेले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रिपाइंला महायुतीकडून सन्मानाची वागणूक दिली जात नाही.अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी तशी भावना बोलून दाखवित आहेत.

हेही वाचा…Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीतून महायुतीविरोधात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा निवडणुकीत महायुतीने रिपाइंला एकही जागा दिली नाही. विधानसभेमध्ये पक्षाला स्वंतत्र निवडणूक चिन्ह असूनही पक्षाला प्रतिनिधित्व देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचे,’ डाॅ. धेंडे यांनी आठवले यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.