साथरोगांच्या प्रचार आणि प्रसाराबाबत सर्वाधिक योगदान देणारा चीन हा अत्यंत बेफिकीर आणि खोडसाळ देश आहे. अनेक साथींच्या निमित्ताने हा अनुभव जगाने घेतला आहे. करोनाही त्याला अपवाद नाही. चीन आणि इतर देशांत दिसणारी रुग्णवाढ ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या चाचण्या, विलगीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाय कठोरपणे राबवा, असे आवाहन राज्याचे करोना विषयक तांत्रिक सल्लागार आणि माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी केले आहे.
हेही वाचा >>>पुणे: खेड शिवापूर ते किकवी मार्गात आता उड्डाणपुलाऐवजी भुयारी मार्ग
करोना महासाथीने देशात महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक वेठीस धरल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही महिन्यांमधील महाराष्ट्रातील साथीचे चित्र निवळले आहे. राज्यात सध्या १३२ सक्रिय रुग्ण आहेत. या रुग्णांना असलेला संसर्ग प्रामुख्याने सौम्य लक्षणे दर्शवणारा असून त्यामुळे बहुतांश रुग्ण हे घरच्या घरी आणि कमीतकमी औषधोपचारांनी बरे होत आहेत. मात्र, जगाच्या काही भागांतील वाढती रुग्णसंख्या, आंतरराष्ट्रीय प्रवासावर नसलेले निर्बंध अशा परिस्थितीत महासाथीच्या काळात राबवण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वर्तन आवश्यक आहे, याकडे डॉ. साळुंखे यांनी लक्ष वेधले. आरोग्य यंत्रणांमध्ये प्राथमिक तयारी आणि साथीच्या काळातील मुखपट्टीसारख्या उपायांची तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत केंद्र आणि राज्य शासनाला कळवले आहे. नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर घाबरुन न जाता संपूर्ण खबरदारी घेऊन दैनंदिन जीवन जगावे आणि करोना लसीकरण पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, असेही डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट केल.
हेही वाचा >>>पुणे: सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकाचे दोन महिन्यांत भूमिपूजन
आपण सतर्क आहोतच
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले,की भारतात सध्या आढळणारे रुग्ण हे ७५ टक्के बीए.२.७५ प्रकारचे, तर उर्वरित बहुतेक रुग्ण हे एक्सबीबी प्रकारचे आहेत. बीएफ.७ चे काही मोजके रुग्ण आपल्याकडे पूर्वी आढळले मात्र येथील लोकसंख्येला संसर्ग करण्यात त्यांना यश आलेले नाही. जनुकीय क्रमनिर्धारणाची प्रक्रिया आपण करत आहोतच. भारतातील रुग्णसंख्येत काही फरक दिसल्यास जनुकीय क्रमनिर्धारणाचा वेगही वाढवण्यात येईल, असेही डॉ. कार्यकर्ते यांनी स्पष्ट केले.
घाबरून जाऊ नये
भारतात लसीकरण पूर्ण झालेल्या लोकसंख्येचे प्रमाण अत्यंत समाधानकारक आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र चीनमधील रुग्णवाढीची बातमी चिंताजनक आहे.-आदर पूनावाला,मुख्य कार्यकारी अधिकारी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया