पुणे : शहरात गेले काही दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचून राहत असल्याचे समोर आले आहे. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे रस्त्यावर साचणारे पाणी साफ करण्यासाठी जेटिंग मशीन तसेच रिसायकल मशीनचा वापर करावा, अशा सूचना मलनिस्सारण विभागाला देण्यात आल्या आहेत. दिवस तसेच रात्रपाळीत ही कामे केली जाणार असून यामध्ये ड्रेनेजची स्वच्छताही केली जाणार आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी याचे आदेश दिले असून, आता शहरातील ड्रेनेज लाईनसह रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याची स्वच्छताही जेटिंग मशीनद्वारे केली जाणार आहे. महापालिकेकडे २५ जेटिंग मशीन असून ८ रिसायकल मशीन आहेत. शहरात पडत असलेल्या पावसामुळे अनेक भागातील रस्त्यांवर पावसाचे पाणी साचत आहे. या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी महापालिका प्रशासनाने अनेक भागांमध्ये पावसाळी गटारांच्या वाहिन्या थेट सांडपाण्याच्या चेंबरमध्ये सोडल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यास तसेच चेंबरमध्ये गाळ, कचरा साचल्याने, आणि क्षमतेपेक्षा अधिक पाणी आल्याने चेंबर फुटतात. तर काही ठिकाणी चेंबरची झाकणे पाण्यासोबत उखडून पडतात. त्यामुळे देखील चेंबरमधील पाणी रस्त्यावर साठून राहत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पावसाचे पाणी साफ करण्यासाठी संबधित चेंबर साफ करण्यासाठी जेटिंग मशीनचा वापर करण्यात येणार आहे.
शहरातील चेंबर ज्या ठिकाणी साफ करणे शक्य नसते, तेथे महापालिकेकडून जेटिंग तसेच रिसायकल मशीनचा वापर करून चेंबरमध्ये साठलेला गाळ काढला जातो. क्षेत्रीय कार्यालयांककडे या जेटिंग मशीनच्या वाहनांचे नियोजन असल्याने ही मशीन दिवसा वापरण्यात येतात. या मशीनची तातडीने आवश्यकता भासत असल्याने आता रात्रीही ही मशिन वापरण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज यांनी दिल्या आहेत.