भारतीय जनता पार्टीच्या कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर पुण्यात हल्ला झाल्याची घटना घडली आहे. कोथरुडमधील सहजानंद सोसायटी भागात दारु पित बसलेल्या तरुणांना जाब विचारणाऱ्या दोघा व्यक्तींवर पहिले हल्ला करण्यात आला. याच परिसरात राहत असणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी घटनास्थळावर जाऊन काय झालं म्हणून विचारणा केल्यानंतर त्यांच्यावरही दारु पिणाऱ्या तरुणांनी हल्ला केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या हल्ल्यात मेधा कुलकर्णी यांच्या हाताला व बोटांना दुखापत झालेली आहे. याप्रकरणी कुलकर्णी यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलेलं आहे. याप्रकरणी लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधींनी मेधा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला. “शनिवारी सोसायटी परिसरात गोंधळ सुरु असल्याचा मला आवाज आला. चार लोकं दारु पिऊन ज्येष्ठ नागरिकांवर अरेरावी करत होते. यावेळी मी ज्येष्ठ नागरिकांच्या बाजूने जात त्यांना जाब विचारला असता माझ्यावर हल्ला झाला. स्थानिकांनी चौघा जणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. इतर तरुण तिकडून पळून जाण्यात यशस्वी ठरले.”

कोथरुड परिसरात गेल्या काही दिवसांपासून दारुड्यांचा प्रचंड त्रास होत आहे. पोलीस याकडे दुर्लक्ष करत असून या भागात गस्त वाढवण्याची मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली. २०१९ विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापून पक्षाने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती. चंद्रकांत पाटील सध्या कोथरुडचे आमदार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drunk youth attack former bjp mla medha kulkarni in kothrud area of pune psd
First published on: 07-06-2020 at 12:41 IST