लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : नशामुक्त महाराष्ट्र (ड्रग फ्री महाराष्ट्र) अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पोलीस आयुक्तालयात करून अमली पदार्थ विक्री आणि तस्करांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर कोथरूडमधील वेताळ टेकडी परिसरात नशेबाज युवक-युवती आढळून आल्याची ध्वनिचित्रफीत अभिनेते रमेश परदेशी यांनी प्रसारित केली. अमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या युवकांच्या पालकांनी जागरूक व्हावे, असे आवाहन परदेशी यांनी केले आहे.
पुणे पोलिसांनी मेफेड्रोन तस्करीचा प्रकार नुकताच उघडकीस आणला. पुणे, दिल्ली, सांगलीत छापा टाकून पोलिसांनी तीन हजार ६०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक करण्यासाठी फडणवीस शनिवारी पोलीस आयुक्तालयात आले होते. फडणवीस यांनी पोलिसांच्या पथकाला २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांनी सातजणांना अटक केली. पुण्यातील कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीतून देश-परदेशात मेफेड्रोन तस्करीचा प्रकार तपासात उघडकीस आला. शहरातील अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.
आणखी वाचा-पुणे : शाळकरी मुलींशी अश्लील कृत्य करणाऱ्या शिक्षकाला न्यायालयाकडून शिक्षा
अमली पदार्थ तस्करांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यात आल्यानंतर वेताळ टेकडी परिसरात युवक-युवती नशेत बेधुंद आढळून आले. अभिनेते रमेश परदेशी वेताळ टेकडी परिसरात फिरायला गेल्यानंतर त्यांना बेधुंदावस्थेतील युवक-युवतींना पाहिले. त्यांनी मोबाइलद्वारे चित्रीकरण करून पालकांनी वेळीच सावध होण्याचे असे आवाहन केले आहे. अभिनेते परदेशी यांच्यासह टेकडीवर फिरायला गेलेल्या नागरिकांनी युवतींना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.