लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयांतर्गत अकरावीपासून असलेले द्विलक्ष्यी व्यवसाय अभ्यासक्रम बंद करण्यात येणार आहेत. त्याऐवजी राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्याप्रमाणे नवीन अभ्यासक्रम पुढील वर्षी २०२४-२५ पासून सुरु करण्यात येणार आहेत.
शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. डॉ. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने १९७८-७९ पासून राज्यात द्विस्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. सद्यस्थितीत तांत्रिक, वाणिज्य, कृषी आणि मत्स्य या चार गटातील एकूण १६ द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबवण्यात येतात.
हेही वाचा… आमदार रवींद्र धंगेकर थेट आरटीओत! अधिकाऱ्यांच्या कामाची झाडाझडती
मात्र हे अभ्यासक्रम कालबाह्य झाल्याने राष्ट्रीय व्यवसाय आराखड्याशी सुसंगत नाहीत. परिणामी मुलांना रोजगार-स्वयंरोजगार, उच्च शिक्षणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहेत. बदलते तंत्रज्ञान आणि शैक्षणिक दर्जा उचांवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा विकसित केले आहे. त्याअंतर्गत नवीन अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शक तत्वेही तयार करण्यात आली आहेत. तांत्रिक, कृषी, वाणिज्य या गटांमध्ये नवे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.
हेही वाचा… सबंध देशावर हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन दुःखाचा – संभाजी भिडे
नवीन अभ्यासक्रमाच्या प्रत्येक तुकडीत पन्नास विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. नवीन अभ्यासक्रमांसाठी आवश्यक कर्मचारी आणि सुविधांची उपलब्धता करणे महाविद्यालयास बंधनकारक राहणार आहे. या बाबतची कार्यप्रणाली व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून निश्चित करण्यात येईल. नवीन अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे नियोजन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नव्या अभ्यासक्रमांच्या अध्यापनासाठी सध्याच्या शिक्षकांनाच प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नवीन शिक्षकांची नियुक्ती करताना संबंधित शिक्षकाने नवीन अभ्यासक्रमासाठी निश्चित केलेल्या शैक्षणिक निकषांची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.