आधार कार्ड तयार करून देणारी यंत्रणा कार्यरत; एकास अटक
शहरात आधार कार्ड मिळवण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पहाटेपासून आधार कार्ड काढून घेणाऱ्यांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळते. पण शहरात बनावट आधार कार्ड काढून देणाऱ्यांचेही काम अनेक ठिकाणी चालत आहे. कारागृहात एका कैद्याची भेट घेण्यासाठी त्याच्या साथीदारांना चिंचवडमधून बनावट आधारकार्ड काढून घेतल्याचा प्रकार मध्यंतरी उघडकीस आला होता. तसेच औंध भागात किराणा मालाच्या दुकानात बनावट आधार कार्ड काढून देणाऱ्या एकाला पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. बनावट आधार कार्ड तसेच आधार कार्डमध्ये दुरुस्ती करून देणारी यंत्रणा शहरात कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
येरवडा कारागृहात असलेल्या साथीदाराला भेटण्यासाठी दोघांनी चिंचवडमधून बनावट आधार कार्ड काढून घेतल्याचे उघडकीस आले होते. कारागृहात असलेल्या कैद्याची भेट घेण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून नातेवाइकांना परवानगी दिली जाते. कैद्याची भेट घेण्यापूर्वी नावनोंदणी करण्यासाठी मुलाखत कक्षात आधार कार्ड सादर करावे लागते. आधार कार्डची झेरॉक्स प्रत तसेच मूळ आधार कार्डची प्रत दिल्यानंतर कैद्याला भेटण्यासाठी परवानगी मिळते. शहरात एक जण बनावट आधार कार्ड काढून देण्याच्या उद्योगात सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या माध्यमातून काही गुन्हेगारांनी बनावट आधार कार्ड काढून घेतले असून, त्याचा वापर कारागृहात असलेल्या साथीदारांना भेटण्यासाठी केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बनावट आधार कार्ड काढून देणाऱ्याचा पोलिसांकडून माग काढण्यात येत आहे. दरम्यान, किराणा मालाच्या दुकानात बनावट आधार कार्ड तयार करून देण्याचा व्यवसाय करणाऱ्या औंधमधील एका किराणा माल विक्रेत्याला चतु:शंृगी पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्याच्याकडून स्कॅनर, कलर प्रिंटर, काही कोरी आणि अर्धवट तयार केलेली आधार कार्ड्स जप्त करण्यात आली आहेत. अवघ्या १२० रुपयांमध्ये हा दुकानदार बनावट आधार कार्ड तयार करून देत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी भंवरलाल सेवाराम चौधरी (वय ४५, रा. आंबेडकर वसाहत, औंध) याला अटक करण्यात आली आहे. आंबेडकर वसाहतीत त्याचे भैरवनाथ प्रोव्हिजन स्टोअर्स नावाचे दुकान आहे. पोलीस नाईक सारस साळवी यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे, अशी माहिती चतु:शृंगी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक केंजळे, हवालदार गुंड, वाघ, पाटील, शेख, चोपडे यांनी ही कारवाई केली होती.
१२० रुपयांत आधार कार्ड
भंवरलाल चौधरी याचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. तो मूळचा राजस्थानमधील पाली जिल्ह्यतील दुधोड गावचा रहिवासी आहे. आधार कार्डमध्ये नाव बदल तसेच अन्य काही दुरुस्ती करण्यासाठी तो नागरिकांकडून पैसे घेत होता. तो बाजारातून आधार कार्ड विकत घेऊन त्याच्यावर बदल करून देत होता. चौधरीने वापरलेले सॉफ्टवेअर तसेच कोरी आधार कार्ड कुठून आणली या बाबतचा तपास सुरू आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शहानिशा केल्यानंतर चौधरीला पकडले होते. चौधरी याच्याकडून तीन जणांच्या नावाने अर्धवट छापलेली बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आली आहेत.
पुणे व पिंपरी शहरात सुरू असलेली आधार केंद्रे
* जिल्हाधिकारी कार्यालय, तळमजला
* आपले सरकार सेवा केंद्र के क्षेत्रीय कार्यालय, हॉकी मैदानाशेजारी, नेहरू नगर, पिंपरी
* आपले सरकार सेवा केंद्र, आर्या एण्टरप्रायझेस, जय गणेश व्हिजन, बी/८१, एचडीएफसी बँकेशेजारी, आकुर्डी
* आपले सरकार सेवा केंद्र, जी क्षेत्रीय कार्यालय थेरगाव, चिंचवड
* आपले सरकार सेवा केंद्र, पोकळे मराठी शाळा, धायरी
* वारजे – कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, स्वप्नशिल्प सोसायटीजवळ, कोथरूड