पुणे : पुण्यातील हवेच्या प्रदूषणाची पूर्वसूचना मिळण्यासाठी एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टिम (पीईडब्ल्यूएस) ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे प्रदूषणाच्या स्रोतांची तपासणी करणे, तातडीच्या उपाययोजना आणि नियोजन करणे शक्य होणार आहे.
अर्बएअरइंडिया सपोर्ट सिस्टिमद्वारे ही प्रणाली पुण्यात कार्यान्वित करण्यात आली.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य डॉ. प्रशांत गार्गव, सी-डॅकचे कार्यकारी संचालक कर्नल (नि.) ए. के. नाथ, वरिष्ठ संचालक डॉ. अक्षरा कागिनालकर, डॉ. मनोज खरे, पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप, मुख्य पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे (आयआयटीेएम) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सचिन घुडे या वेळी उपस्थित होते. नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ संशोधन आणि विकास कार्यक्रमाअंतर्गत सी-डॅक, आयआयटीएम, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तरीत्या ही प्रणाली विकसित केली आहे.
पुणे अर्ली वॉर्निंग सिस्टिममध्ये (पीईडब्ल्यूएस) एक किलोमीटरच्या क्षेत्रातील उत्सर्जन मोजण्याची उच्च क्षमता आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरातील हवेतील पीएम१०, पीएम२.५, एसओ२, एनओएस आदी घटकांची माहिती या प्रणालीद्वारे दिली जाते. रसायनशास्त्रासह उच्च क्षमतेचे हवामान अंदाज प्रारुप या प्रणालीद्वारे उपलब्ध झाले आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील प्रदूषणाचा तीन दिवस आधीच अंदाज बांधणे शक्य आहे. शहरी हवेच्या गुणवत्तेच्या व्यवस्थापनासाठी, मूल्यांकनासाठी ही प्रणाली महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला उपयुक्त ठरेल. त्याद्वारे प्रदूषण कमी करण्याचे नियोजन अधिक सुलभ होऊ शकेल.