वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे आमच्या चमूतील एकाची तब्येत बिघडली. एव्हरेस्ट सर करणाऱ्या मोहिमेतील वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे मी त्या सहकाऱ्यासमवेत बेस कॅम्पलाच होतो. २५ एप्रिलला अचानक सारे काही हलायला लागले. तंबूमध्ये असलेल्या सहकाऱ्याचा हात धरायला गेलो खरा पण, मी उडून बाजूला फेकला गेलो. समोरून डोंगरच्या डोंगर कोसळताना दिसत होते. एका क्षणी वाटले आता काही खरे नाही. ती रात्र आम्ही जागूनच काढली. पण, दैव बलवत्तर म्हणून त्या संकटातून सुखरूप बाहेर पडून पुण्यामध्ये परतण्यात यश मिळाले.. जणू काल घडला असावा असा प्रसंग शब्दांत सांगताना डॉ. अनूप कुलकर्णी यांची अवस्था ‘अजून आठवे ती ..’ अशीच झाली आहे. ‘खरं म्हणजे जे घडतंय तो भूकंप आहे, हे कळायलाच खूप वेळ गेला,’ असेही त्यांनी सांगितले.
एव्हरेस्ट सर करणाऱ्या दुसऱ्या एका मोहिमेतील एकमेव वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. अनूप कुलकर्णी हे भूकंपाचा अनुभव घेऊन लासामार्गे काठमांडू, काठमांडू ते मुंबई असा प्रवास करून पुण्यामध्ये परतले आहेत. मी सुखरूप परतल्याचा आनंद घरातील मंडळींना आहे. तर, दुसऱ्या बाजूला या धक्क्यातून अजून मी सावरतो आहे. मात्र, मित्रमंडळी आणि नातेवाइकांना हा सारा थरार माझ्याकडून अनुभवयचा आहे, अशी माझी सध्याची अवस्था असल्याचे त्यांनी सांगितले. अंगावरचे कपडे, गॉगल आणि कॅमेरा एवढेच घेऊन मी परतलो आहे. बँकेची डेबिट आणि क्रेडिट कार्ड, वाहन परवाना आणि अन्य ओळखपत्रे यासह बाकी सारे सामान ‘अॅडव्हान्स बेस कॅम्प’मध्ये पाठविले आहे. आम्हाला चायनीज चलन लागेल असे कधी वाटले नव्हते. मात्र, दुसऱ्या चमूतील पायलटकडून काही रक्कम उधार घेऊन परतीचा प्रवास करावा लागला, असेही त्यांनी सांगितले.
अॅटलास कॉप्कोमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून अनूप कुलकर्णी कार्यरत आहेत. चीनमधील दाबेयुजवळील ५१०० मीटर उंचीवर असलेल्या बेस कॅम्पमध्ये असताना २५ तारखेला भूकंप झाला. त्या दिवशी तीन धक्के बसले. तर, दुसऱ्या दिवशी आणखी दोन धक्के बसले. या धक्क्य़ातून सावरत मी पत्नीशी व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून संवाद साधत होतो. मात्र, अचानक मोबाइलची रेंज गेली. रेडिओ सिग्नल यंत्रणा कोसळली आणि जणू जगाशी संपर्क तुटला. नेपाळमध्ये भूकंप झाल्याचा फटका आमच्या मोहिमेला बसला. या भूकंपामुळे गिर्यारोहकांनी बेस कॅम्पवरच थांबावे, अशी सूचना चायनीज माउंटेनिअिरग असोसिएशनने दिल्या होत्या. एव्हरेस्ट सर करण्याआधी काळ झडप घालतो की काय अशी परिस्थिती असताना एका अर्थाने पुनर्जन्म झाला, अशीच माझी भावना असल्याचे अनूप कुलकर्णी यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 6th May 2015 रोजी प्रकाशित
अजून आठवे ती भूकंपानंतरची रात्र
समोरून डोंगरच्या डोंगर कोसळताना दिसत होते. एका क्षणी वाटले आता काही खरे नाही. ती रात्र आम्ही जागूनच काढली.

First published on: 06-05-2015 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earthquake nepal anup kulkarni