पुणे : खिश्चन बांधवांचा पवित्र सप्ताह आणि चाळीस दिवसांच्या उपवासाची सांगता ‘ईस्टर संडे’च्या प्रार्थनेने रविवारी झाली. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान दिवसाच्या निमित्ताने कॅथलिक आणि प्रोटेस्टंट संप्रदायांच्या चर्चमध्ये धर्मगुरुंच्या उपस्थितीत खिचन बांधवांनी विशेष प्रार्थना केली.

भल्या पहाटे काढण्यात आलेल्या पुनरुत्थान दिंड्यांनी ईस्टर संडेची सुरुवात झाली. ठिकठिकाणच्या दिंड्यांमध्ये भाविक सहकुटुंब सहभागी झाले होते. सकाळी सहाच्या सुमारास प्रभुभोजनाने या दिंड्यांची सांगता झाली. संगीत महाविधी नंतर भाकरी आणि द्राक्षांच्या रसाचे वाटप धर्मगुरुंनी केले. त्यासाठी भाविकांनी चर्चमध्ये गर्दी केली होती. दोन्ही संप्रदायांमध्ये हा विधी परंपरेनुसार पार पडला.

प्रभातफेरीनंतर धर्मगुरूंनी प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची कथा भाविकांना सांगितली. उपासनेसाठी चर्चमध्ये सभासद, महिला मंडळ, तरुण संघ व संडे स्कूलचे शिक्षकही उपस्थित होते. समाजमाध्यमांवरही ख्रिस्त बांधवांनी नातेवाईक आणि मित्रमंडळींना ‘हॅपी ईस्टर’चे संदेश पाठविले. काही चर्चमध्ये रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील चर्च ऑफ द होली नेम (गुरुवार पेठ), ईमॅन्युअल चर्च (गंज पेठ), सेंट मेरी चर्च (खडकी), ब्रदर देशपांडे चर्च (कसबा पेठ), सेंट मॅथ्युज चर्च (आंबेडकर रस्ता), सेंट मेरी चर्च (पुलगेट), क्राईस्ट चर्च (रास्ता पेठ), मेथडीस मराठी चर्च (पुलगेट), द युनायटेड चर्च ऑफ दि खाईस्ट (पिंपरी) अशा विविध चर्चमध्ये धर्मगुरुंच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.

ईस्टर निमित्त पाळक सुधीर गायकवाड, सुधीर पारकर, रूपेश शिंदे, चंद्रशेखर जाधव, राजेंद्र शिरसाट, जयप्रकाश आढाव, एरिट म्हस्के, मनोज काटे, भारत जॉन, विजय म्हंकाळे, पराग लोंढे, आल्फ्रेड तिवडे यांनी सर्व समाजबांधवांना शांतीचा संदेश दिला.

ईस्टर हा ख्रिस्ती लोकांसाठी नाताळा इतकाच महत्वाचा सण आहे. या दिवशी येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला. या घटनेच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. स्वर्गारोहण होईपर्यत पुढील चाळीस दिवस ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसह इतरांनाही दर्शन दिले. या घटनेची सविस्तर कथा बायबल मधील चारही शुभवर्तमानात सांगितली आहे. – सुधीर चांदेकर, सभासद, चर्च ऑफ द होली नेम