पुणे : विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान निर्माण करण्यासाठी राज्यातील शाळांना स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) विद्यार्थ्यांच्या कवायती आयोजित कराव्या लागणार आहेत. समर्पक पेहराव करून, देशभक्तीपर पार्श्वसंगीताचा वापर करून कवायतींचे सादरीकरण प्रभावी पद्धतीने करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहेत. दरम्यान, अनेक शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचे शिक्षक नसल्याने असलेल्याच शिक्षकांना आता कवायतही शिकवावी लागणार असल्याचा सूर शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

शालेय शिक्षण विभागाने प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना ३१ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केल्या होत्या. त्यात प्रभात फेरी, भाषण स्पर्धा, कविता स्पर्धा, नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, खेळ अशा विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले होते. त्याच धर्तीवर, आता स्वातंत्र्यदिनी राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये झेंडावंदनानंतर विद्यार्थ्यांचे कवायत संचलन कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षण आयुक्तांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालकांना कवायतींच्या आयोजनाबाबत परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत.

शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांनुसार, देशाच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, देशभक्तीची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य चळवळींवर आधारित कवायत, स्वातंत्र्यदिनी शाळांमध्ये किमान २० मिनिटे कालावधीचे कार्यक्रम आयोजित करावेत. कवायतीमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील आणि सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असावा. या संदर्भातील कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आताही शाळांमध्ये स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनासह उपक्रम आयोजित केले जातात. त्यात प्रभात फेरी, देशभक्तीपर व्याख्याने, समूहगीते असे कार्यक्रम, तसेच पारितोषिक वितरण, खाऊ वाटप असे उपक्रम होतात. आता त्यात कवायतींचीही भर पडली आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकच नाहीत. त्यामुळे असलेल्याच शिक्षकांना कवायत शिकवण्याचेही काम करावे लागणार आहे, असे माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी सांगितले.