पिंपरी : ‘शिवसेनेचे (शिंदे) पुणे महानगरप्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची भूमिका भाजपविरोधात नाही. ज्या गोष्टीची माहिती मिळाली, त्यावर ते बोलले आहेत. महायुतीत दंगा करायचा नाही, असे धंगेकर यांना सांगितले आहे. जैन बोर्डिंग प्रकरणावर लवकरच पडदा पडेल,’ असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

आळंदीतील भक्त निवास आणि महाद्वार ते पुंडलिक मंदिर घाट सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री उदय सामंत, भरत गोगावले, रवींद्र धंगेकर या वेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘रवींद्र धंगेकर काम करणारा आणि अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता आहे. महायुतीत दंगा करायचा नाही, असे मी त्यांना सांगितले आहे. तो विषय आता संपला आहे. धंगेकर यांना ज्या गोष्टीची माहिती मिळाली, त्यावर ते बोलले. शेवटी महायुती आहे. विरोधकांच्या हातात कोणतेही कोलीत द्यायचे नाही, असे धंगेकर यांना सांगितले आहे. जे प्रकरण सुरू आहे, त्यावर लवकरच पडदा पडेल आणि हा विषय संपेल.’

‘इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प’

‘आळंदीत चांगल्या दर्जाचे भक्त निवास होईल. यामुळे वारकऱ्यांची मोठी सोय होईल. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यावर काम सुरू आहे. राज्य सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. नदी प्रदूषणमुक्त करणे हे आमचे प्रमुख काम आहे. प्रदूषणमुक्त नदी करण्यासाठी जे काही करावे लागेल ते केले जाईल. इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प केला आहे,’ असे शिंदे यांनी सांगितले.

डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण जलदगती न्यायालयात

‘साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. यामध्ये सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा दिली जाईल’, असेही शिंदे म्हणाले.

‘महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही’

‘रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदे यांना भेटले आहेत. माझीही त्यांच्याशी चर्चा झाली आहे. गैरसमज दूर करण्यासाठी शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे याला अंतिम स्वरूप येईल. पुढे चाललेल्या गोष्टी थांबतील. महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही, याची सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दक्षता घेतली पाहिजे’, असे मंत्री सामंत म्हणाले.

‘वाईट प्रवृत्तीविरोधात लढाई सुरूच राहणार’

रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘दोन दिवसांत तोडगा काढू, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे शिंदे यांच्याबरोबर बोलले असतील. जैन मंदिराला बांधकाम व्यावसायिकांनी घातलेला गराडा काढून मंदिर जैन समाजाला देईल, असे आश्वासन मोहोळ यांनी शिंदे यांना दिलेले दिसत आहे. तोडगा नाही निघाला, तर मी जैन समाजाबरोबर आहे. वाईट प्रवृत्तीविरोधात माझी लढाई सुरूच राहणार आहे’.