पिंपरी-चिंचवड: बाप लेकाने वयोवृद्ध व्यक्तीला जीवनदान दिलं आहे. कामशेत रेल्वे स्थानकाजवळ इंद्रायणी नदीमध्ये वृद्ध व्यक्तीने जीवन संपवण्याच्या उद्देशाने नदीत उडी घेतली. सुदैवाने मावळ वन्यजीव रक्षकचे अध्यक्ष अनिल आंद्रे आणि शुभम आंद्रे यांनी वेळेत पोहचून काशिनाथ भीमा मिरगळे यांना वाचवण्यात यश आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सव्वा नऊ च्या सुमारास कामशेत रेल्वे स्थानकाजवळ इंद्रायणी नदीमधून ओरडण्याचा आवाज येत होता. याबाबतची माहिती कामशेत पोलिसांना देण्यात आली. तोपर्यंत पोलीस पाटील यांनी मावळ वन्यजीव रक्षक अध्यक्ष अनिल आंद्रे यांच्याशी संपर्क केला. तातडीने अनिल आंद्रे यांनी मुलगा शुभम ला सोबत घेऊन घटनास्थळ गाठलं.
टॉर्च घेऊन काशिनाथ यांचा आवाज कुठे येतोय ते पाहिलं, त्यांना शोधल्यानंतर लाईफ जॅकेट घालून नदीत उडी घेतली. मुलगा आणि इतर किशोर लष्करे, सचिन शेडगे यांनी दोरी ओढून मदत केली. काशिनाथ यांना बाहेर काढण्यात आल. पोटातील पाणी बाहेर काढलं गेलं. काशिनाथ यांनी आयुष्याला कंटाळून हे पाऊल उचलण्याच त्यांच्या बोलण्यातून जाणवल्याच आंद्रे यांनी सांगितलं. काशिनाथ हे विजापूर येथील असून सध्या ते चाकणमध्ये राहतात. मावळ वन्यजीव रक्षक आणि शिवदुर्ग लोणावळा यांनी वेळेत पोहचून वयोवृद्ध व्यक्तीचा जीव वाचवला आहे.