पुणे : धनकवडीतील शंकर महाराज वसाहतीतील घरात ७५ वर्षीय महिला मृतावस्थेत सापडल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. महिलेच्या अंगावरील दागिने आणि घरात ठेवलेली २० ते २५ हजारांची रोकड चोरीला गेली असून, ज्येष्ठ महिलेचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणाचा सहकारनगर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
कुसुम पन्हाळे (वय ७५, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी, पुणे-सातारा रस्ता) असे मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद सहकारनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी कुसुम पन्हाळे राहत्या घरात बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती रहिवाशांनी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांना त्वरीत ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पन्हाळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालात त्यांच्या मृत्युमागचे कारण समजेल, अशी माहिती सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी दिली.
पन्हाळे यांची विवाहित मुलगी धनकवडीतील बालाजीनगर भागात राहायला आहे. त्यांच्या मुलीला या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांची मुलगी शंकर महाराज वसाहतीतील घरी आली. तिने घराची पाहणी केली. तेव्हा घरात ठेवलेले २० ते २५ हजार रुपये चोरीला गेल्याचे तिने सांगितले. तसेच आईने परिधान केलेले चार तोळ्यांचे दागिने चोरीला गेल्याची माहिती मुलीने पाेलिसांना दिली आहे. प्राथमिक तपासात ज्येष्ठ महिलेचा खून चोरीचा उद्देशातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.
