पुणे : भरधाव रिक्षा उलटून प्रवासी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना येरवड्यातील नागपूर चाळ परिसरात घडली. भरधाव रिक्षा चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
शोभना लक्ष्मण मोहिते (वय ७८, रा. जाधवनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. या प्रकरणी रिक्षाचालक पितांबर लोटन देसले (वय २८, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मोहिते यांचा मुलगा सतीश (वय ५६) यांनी येरवडा पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभना मोहिते या ११ सप्टेंबर रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास रिक्षातून निघाल्या होत्या. त्यावेळी येरवडा टपाल कार्यालयासमोर भरधाव रिक्षा उलटली. अपघातात मोहिते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मोहिते यांचा मुलगा सतीश यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. रिक्षाचालकाच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक सत्रे तपास करत आहेत.