कमकुवत यंत्रणेमुळे विजेचा उन्हाळी लपंडाव; उकाडय़ात नागरिकांचे हाल

वीजबिलांची पुरेपूर वसुली करण्याच्या दृष्टीने मागील काही महिन्यांपासून थकबाकीदारांविरुद्ध जोरदार मोहीम उघडून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू असतानाच महावितरण कंपनीच्या कमकुवत यंत्रणेमुळे पुणे आणि िपपरी-चिंचवड शहराच्या अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून विजेचा उन्हाळी लपंडाव सुरू झाला आहे. वीजबिलांची वसुली जोमात असली, तरी वीजयंत्रणा मात्र कोमात असल्याची सद्य:स्थिती आहे. ऐन उकाडय़ामध्ये दिवसा आणि रात्रीही काही भागात सातत्याने वीज गायब होत असल्याने नागरिकांकडून संपात व्यक्त करण्यात येत आहे.

वीजबिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे वीजबिल वसुलीची व्यापक मोहीम महावितरणकडून राबविण्यात आली. थकबाकी वसुली न झाल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाईचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले होते. अगदी शंभर रुपये थकबाकी असेल, तरीही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे पुणे विभागात महिनाभरातच पन्नास हजारांहून अधिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडण्यात आला. मात्र, दुसऱ्या बाजूला अनेक भागामध्ये महावितरणच्या कमकुवत वीजयंत्रणेचा फटका नागरिकांना बसतो आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरातील उष्णतेचा पारा चाळीसच्या आसपास गेल्याने शहरात विजेच्या मागणीमध्ये वाढ झाली होती. यंत्रणेमध्ये वीज पुरेशा प्रमाणात मिळते आहे. आवश्यक आणि दीर्घ मुदतीचे वीज खरेदीचे करार यापूर्वीच पूर्ण झाले असल्याने यापुढेही वीज उपलब्ध होण्याबाबत अडचण येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अनेक भागात सक्षम वीजयंत्रणा नसल्याचेही वास्तव आहे. मागेल त्याला वीजजोड देण्याचे महावितरणचे धोरण ठेवताना संबंधित भागात वीजपुरवठा करण्यासाठी सक्षम वीज उपकेंद्र, वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर आदी बाबींकडे बहुतांश वेळेला लक्ष दिले जात नाही. त्यामुळे विजेचा भार वाढल्यास यंत्रणा कात टाकत असल्याचे दिसून येते. या उन्हाळ्यातही हीच स्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात दिवसा, रात्री केव्हाही वीज गायब होते. त्यातून नागरिकांची गैरसोय होण्याबरोबरच यंत्रणेवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही धावपळ होत आहे.

दर्जा ए प्लस’, सेवा बोगस!

वीजबिलांच्या वसुलीनुसार आणि गळतीच्या प्रमाणानुसार महावितरण कंपनीने अ, ब, क, ड, अशा प्रकारे विभागांची वर्गवारी केली आहे. विजेची कमतरता असल्यास विजेची कपात करताना खालून सुरुवात केली जाते. पुण्याची वीजगळती राज्यात सर्वात कमी असून, वसुलीचे प्रमाणही सर्वाधिक आहे. त्यामुळे पुण्याला ‘अ’ दर्जाच नव्हे, तर ‘ए प्लस’ हा अतिउच्च दर्जा देण्यात आला आहे. मात्र, हा दर्जा केवळ कागदोपत्रीच असल्याचे शहरातील विजेच्या सद्य:स्थितीने अधोरेखीत होते आहे. त्यामुळेच, ‘दर्जा ‘ए प्लस’ आणि सेवा बोगस’, असा आरोप करण्यात येत आहे.

विद्युत समिती कुठे आहे?

वीज पुरवठादार कंपनीकडून करण्यात येणाऱ्या कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे वीज ग्राहकांच्या समस्या मांडून त्याची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागामध्ये वीज कायद्यानुसार विद्युत समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील ज्येष्ठ खासदार या समितीचे अध्यक्ष असतात. पूर्वी शरद पवार त्यानंतर सुरेश कलमाडी, तर सध्या शिवाजीराव आढळराव-पाटील हे समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीच्या वेळोवेळी बैठकाही होणे अपेक्षित असते. मात्र, ही समिती सध्या कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ऊर्जामंत्री आज स्वत: तक्रारी स्वीकारणार

राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवारी (२० एप्रिल) वीजग्राहकाकडून येणाऱ्या तक्रारी, सूचना आणि निवेदने स्वत: स्वीकारणार आहेत. रास्ता पेठ येथील महावितरण कंपनीच्या परिमंडल कार्यालयात हा कार्यक्रम होणार असून, दुपारी १२ ते २ या वेळेत ते नागरिकांच्या तक्रारी स्वीकारणार आहेत. नागरिक तसेच सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून येणाऱ्या तक्रारींचे निराकरणही ऊर्जामंत्री करणार असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.