पुणे : प्रवाशांसाठी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या आपत्कालीन वैद्यकीय कक्ष आता पूर्वनियोजित जागीच होणार आहे. एका अधिकाऱ्याच्या विरोधामुळे ही चांगली योजना गुंडाळण्याची वेळ आली होती. ‘लोकसत्ता’ने वृत्त दिल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने अखेर आधी ठरलेल्या जागीच हा कक्ष उभारण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. पुणे स्थानकावरील आपत्कालीन वैद्यकीय कक्षाच्या उभारणीचे कंत्राट रूबी हॉल रुग्णालयाला देण्यात आले.

रेल्वे पोलीस दलाच्या (आरपीएफ) वाहनतळाच्या जागेत हा कक्ष उभारण्याचे निश्चित झाले होते. याबाबत नुकतेच रुबी हॉलचे पथक पाहणीसाठी स्थानकावर आले. त्यावेळी रेल्वे पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पिटाळून लावले. नंतर हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर गेला. त्यावेळी वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त उदयसिंह पवार यांनी हा विरोध केल्याचे समोर आले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी निर्णय घेतलेला असतानाही हा विरोध करण्यात आला होता. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त वस्तुस्थिती मांडली होती. यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने शुक्रवारी निर्णय घेत आधी ठरलेल्या जागीच आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : पुण्यातून ५० कोटी रुपयांचे ‘मेथाक्युलोन’ अमली पदार्थ जप्त; महसूल गुप्तचर यंत्रणेची कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा कक्ष पुणे स्थानकाच्या आवारात असलेल्या रेल्वे पोलीस दलाच्या वाहनतळाच्या जागेत उभारण्यात येणार आहे. त्याला रूबी हॉल रुग्णालयाने संमती दर्शविली आहे. यामुळे रेल्वे स्थानकात आपत्कालीन प्रसंगी प्रवाशाना वैद्यकीय सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘पुणे स्थानकावर रेल्वे पोलीस दलाच्या वाहनतळाच्या जागेत आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे विभाग आपत्कालीन वैद्यकीय कक्ष तयार करण्यास आणि तो वेळेवर सुरू करण्यास कटिबद्ध आहे’, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी म्हटले आहे.