पदविका प्रथम वर्षांसाठी निर्णय; राज्यातील १७९ संस्थांमध्ये लागू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे :  राज्यातील १७९ संस्थांमध्ये अभियांत्रिकी पदविका अभ्यसक्रमाचे प्रथम वर्ष इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये शिकवण्यास यंदापासून सुरुवात  झाली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) संकलित केलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षणाचे आवाहन केले होते. त्यानुसार एमएसबीटीईने यंदापासून अभियांत्रिकी पदविका इंग्रजी आणि मराठीतून शिकवण्याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले होते. तसेच या दोन भाषांतून अभ्यासक्रम शिकवू इच्छिणाऱ्या संस्थांना माहिती देण्यास सांगण्यात आले. द्विभाषिक अभ्यासक्रमासाठी मंडळाकडून सैद्धांतिक विषयांसाठी मराठी अभ्यास साहित्याची निर्मिती करण्यात आली आहे. तर अन्य अभ्यास साहित्याची निर्मिती संस्थास्तरावर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि पाठय़क्रम प्रचलित पद्धतीनुसार इंग्रजीमध्येच राहील. पण सैद्धांतिक विषयांच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठीतून उत्तरे लिहिण्याची मुभा असेल. द्विभाषिक अभ्यासक्रम निवडलेल्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी कौशल्य विकसित करण्यासाठी इंग्रजी कार्यप्रशिक्षण देण्याबाबतही स्पष्ट करण्यात आले.

तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे म्हणाले, की राज्यातील एकूण साडेतीनशे संस्थांमध्ये अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम राबवले जातात. त्यापैकी १७९ संस्थांनी इंग्रजी आणि मराठीतून अध्यापन सुरू केले आहे. दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमाला येणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजीतून अभ्यासक्रम थोडा जड जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी द्विभाषिक अभ्यासक्रम यंदा प्रथम वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे.

आतापर्यंत ग्रामीण भागातील मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमात इंग्रजीशिवाय मराठीतूनही अनौपचारिक पद्धतीने शिकवावे लागत होते. पण आता अधिकृतपणे मराठीचा समावेश झाला हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक सोप्या पद्धतीने विषय समजण्यास मदत होत आहे.

डॉ. अतुल बोराडे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, गडचिरोली</strong>

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Engineering course marathi decision ysh
First published on: 05-01-2022 at 00:24 IST