पुणे : राजगड तालुक्यातील सुमारे ४० किलोमीटर लांब असलेल्या ‘कामथडी ते पाबे’ वीजवाहिनीच्या तारा शुक्रवारी (२३ मे) रात्री साडेअकराच्या सुमारास तुटल्याने परिसरातील ४१ गावांचा, वाड्या-वस्त्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. सहा हजार ग्राहकांना अंधारात रात्र काढावी लागली. मात्र, भर पावसात ‘महावितरण’च्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी जंगलातून चिखलाने भरलेली वाट तुडवत, कोल्ह्यांचा हल्ला चुकवून रात्रभर दुरुस्तीचे काम केले. त्यामुळे शनिवारी (२४ मे) पहाटे सहाला सर्व गावांचा, वाड्या-वस्त्यांचा वीजपुरवठा सुरळीत झाल्याची माहिती ‘महावितरण’कडून देण्यात आली.

‘महावितरण’च्या नसरापूर उपविभागातील पाबे ३३ केव्ही वीजवाहिनीद्वारे राजगड तालुक्यातील पाबे उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात येतो. उपकेंद्रांतील चार वीजवाहिन्यांद्वारे वेल्हा गाव, पाबे, दापोडी, विंझर, वाजेघर, पाल यांसह सुमारे ४१ गावे आणि वाड्या-वस्त्यांमधील ६ हजार घरगुती, व्यावसायिक ग्राहक आणि शेतीपंपांना वीजपुरवठा होतो. मात्र, ४० किलोमीटर लांबीची व पूर्णतः जंगलात असलेल्या पाबे वीजवाहिनीमध्ये शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे परिसरातील सहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

महावितरणच्या कर्मचारी, अभियंत्यांनी बिघाड शोधण्याचे काम तत्काळ सुरू केले. त्यांना सातारा महामार्गावरील कामथडी येथे निबिड जंगलात वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाने चार वीज खांबांवरील तारा तुटल्याचे आढळले. ज्या ठिकाणी वीजतारा तुटल्या त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी जाणे अतिशय धोक्याचे आणि जिकिरीचे होते. भाताच्या खाचरात व जंगलातील निसरड्या चिखलामुळे तिथे चालणेही कठीण होते. मात्र, उपकार्यकारी अभियंता नवनाथ घाटुळे, वेल्हा शाखेचे कनिष्ठ अभियंता सचिन कुलकर्णी यांनी समीर मुजावर, सूर्यकांत शिंदे, गणेश शिंदे, राहुल भुरूक, रवी कातुरडे, नीलेश शेंडकर, गणेश गायके, अमोल डांगे, चेतन चोरगे, अमोल रणभोरे या तंत्रज्ञांसह तारांच्या दुरुस्तीचे काम रात्रीच करण्याचा निर्णय घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांनी भर पावसात जंगलातून साधनसामग्री नेऊन मोबाइल, बॅटरीच्या उजेडात तुटलेल्या तारा जोडण्याचे काम मध्यरात्री बाराच्या सुमारास सुरू केले. रानडुक्कर आणि कोल्ह्यांचा वावर असल्याने सगळे सावध होते. तरीही मुजावर यांच्यावर दोन कोल्हे हल्ला करण्याच्या तयारीत असतानाच दोन-तीन सहकाऱ्यांनी आरडाओरड केला. कोल्ह्यांच्या तोंडावर प्रकाशझोत टाकला. त्यामुळे मुजावर यांचा जीव वाचल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. पाबे वीजवाहिन्याच्या तुटलेल्या तारा जोडल्याने उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरू झाला. त्यानंतर या उपकेंद्रातील चार वीजवाहिन्यांद्वारे सकाळी सव्वादहाच्या सुमारास सर्व सहा हजार घरगुती, व्यावसायिक व शेतीपंपांना वीजपुरवठा करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.