पिंपरी: शहरातून वाहणा-या पवना आणि इंद्रायणी नदीत मैलामिश्रित, रसायनयुक्त पाणी थेटपणे सोडले जाते. त्यामुळे दोन्ही नद्यांची दुरवस्था झाली असून पाण्यावर तवंग येत आहेत. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत नदी प्रदूषणाला जबाबदार असणा-यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीची महापालिका हद्दीतील लांबी २४.३४ किलोमीटर, इंद्रायणी नदीची एकूण लांबी २०.८५ किलोमीटर आहे. तर मुळा नदी शहराच्या सीमेवरून दहा किलोमीटर अंतर वाहते. तळवडेपासून च-होलीपर्यंत इंद्रायणी नदीचे प्रदूषण वाढले आहे. तर, किवळेपासून दापोडीपर्यंत पवना नदीचे प्रदूषण वाढले आहे. नदीलगतच्या भागात किवळे, पुनावळे, रावेत, ताथवडे, वाल्हेकरवाडी, थेरगाव, चिंचवडगाव, काळेवाडी, पिंपरी, दापोडी, पिंपळेगुरव, सांगवी, कासारवाडी व दापोडीपर्यंत पाण्याचे प्रदूषण वाढल्याचे दिसून येते.
हेही वाचा… पुणे: औषधी गोळीतून ब्लेड गिळायला देऊन महिलेच्या खुनाचा प्रयत्न; पती अटकेत
मागील पावसाळ्यात पवना नदीतील पाण्यावर पाचवेळा तवंग आले. थेरगावातील केजुदेवी बंधारा ते चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी घाट या दरम्यान पाण्यावर मोठ्या प्रमाणात तवंग येत आहेत. जलचर प्राणी मृत पडत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक वसाहती, इंद्रायणी नदीकाठच्या कारखान्यातील रसायनयुक्त पाणी, गावांमधील मैलायुक्त पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. मैलायुक्त पाणी हे इंद्रायणी नदीला प्रदूषित करत आहे. मागील आठवड्यात इंद्रायणी नदीतील पाण्यावर मोठ्या प्रमाणात तवंग आले होते. एखाद्या अती थंड प्रदेशात ज्याप्रमाणे नदीवर बर्फाची चादर असते तशीच अवस्था इंद्रायणी नदीची झाली होती. नदी प्रदूषणाला महापालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.
पवना, इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत सातत्याने आवाज उठवत आहोत. परंतु, महापालिका प्रशासन नदीच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नदी प्रदूषणाला जबाबदार असणा-यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पंतप्रधानांकडे पत्राद्वारे केली आहे. -प्रशांत राऊळ, पर्यावरणप्रेमी