पिंपरी : मुळा नदी सुशोभीकरणास विरोध दर्शविण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी गुरुवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. यामध्ये विविध क्षेत्रांतील काम करणारे नागरिक सहभागी झाले होते. मात्र, खासदार, आमदार आणि महापालिकेतील माजी पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सीमेवर असणाऱ्या मुळा नदीच्या सुशोभीकरणाचे काम सुरू झाले आहे. नदीचा नैसर्गिकपणा कायम ठेवावा, नदी स्वच्छ करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींची आहे. मात्र, महापालिकेच्या वतीने प्रकल्पाचे काम सुरूच आहे. त्यामुळे पर्यावरणवादी संघटनांच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी लाक्षणिक आंदोलन केले.

ज्येष्ठ पर्यावरणवादी नरेंद्र चुघ, धनंजय शेडबाळे, रमेश सरदेसाई, माजी नगरसेवक मारुती भापकर, जयंत बागल, पिंपरी-चिंचवड सिटिझन फोरमचे तुषार शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, सूर्यकांत मुथियान, नामदेव जाधव, आकांक्षा पांडे, देवा तांबे, प्राजक्ता महाजन आदी नागरिक आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

घोषणांनी परिसर दणाणला

‘खाली डोके वर पाय’, ‘साद घालते मुळामाई प्रतिसाद तिला देऊ’, ‘संकटातुनी करूया मुक्त’, ‘पर्यावरणपूरक विकास, नदीकाठ नका करू भकास’, ‘नदीसुधारच्या नावाखाली वृक्षतोड थांबवा,’ ‘नष्ट करू नका पर्यावरणाचा समतोल’ अशा घोषणा देण्यात आल्या.

महापालिका लुटण्याचे काम प्रशासन करत आहे. त्यासाठीच नदीसुधार कार्यक्रम हाती घेतला आहे. नद्यांच्या आंदोलनामध्ये आता नागरिकांनी आपली ताकद दाखवायला हवी.मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते