राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाचा प्रकल्प ; उभारणीसाठी नियोजन सुरू

चिन्मय पाटणकर

राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडून (एनटीए) देशभरात संगणकावर आधारित परीक्षांसाठीची परीक्षा केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. देशभरातील सहाशे जिल्ह्यांमध्ये मिळून सत्रनिहाय दोन लाख विद्यार्थी आणि प्रत्येक परीक्षेसाठी किमान अडीचशे विद्यार्थ्यांची सोय होऊ शकणारी परीक्षा केंद्रे तयार केली जाणार असून, इच्छुक संस्थांबरोबर भागीदारी करणेही शक्य असल्याचे एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 एनटीएकडून सध्या प्रवेश परीक्षा, भरती परीक्षा आणि पात्रता परीक्षा घेतल्या जातात. काळानुरूप नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मूल्यमापन पद्धतीचे नवे मार्ग विकसित करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एनटीवर जबाबदारी सोपवली आहे. या अंतर्गत देशभरात संगणकावर आधारित परीक्षा केंद्रे उभारण्याचा प्रकल्प आहे. त्यासाठी देशभरात परीक्षा केंद्रांच्या उभारणीसाठी एनटीएने देशभरातील विद्यापीठांकडून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती मागवली आहे. परीक्षा केंद्रासाठी किमान साडेसहा हजार चौरस फूट जागा आवश्यक आहे. या जागेत एनटीएकडून माहिती तंत्रज्ञानाच्या सुविधा निर्माण केल्या जातील. विद्यापीठांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेली जागा आणि सुविधांची माहिती सादर करण्यासाठी १० जुलैची मुदत देण्यात आली आहे.

परीक्षा केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांना एनटीएकडून विकसित केल्या जाणाऱ्या डेटा ऑनोटेशन, इमेज क्लासिफिकेशन, स्पीच ट्रान्स्क्रिप्शन अशा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सुविधांचा वापर करता येईल. संबंधित परीक्षा केंद्रांचा उपयोग राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये नमूद केलेले माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रम राबवण्यासाठीही केला जाऊ शकतो. या परीक्षा केंद्रांद्वारे अधिप्रमाणित माहिती तंत्रज्ञानावर आधारित परीक्षा केंद्रांची सुविधा निर्माण होईल. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी या परीक्षा केंद्रांचा वापर व्हच्र्युअल प्रयोगशाळा म्हणूनही करणे शक्य आहे, असे एनटीएने स्पष्ट केले आहे.

परीक्षांतील गैरप्रकारांना आळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशभरात ऑनलाइन परीक्षांसाठी सुसज्ज परीक्षा केंद्र विकसित करण्यातून प्रमाणित वातावरण आणि कोणतेही गैरप्रकार होऊ न देता परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पातून साध्य होऊ शकेल, असेही एनटीएने नमूद केले आहे.