scorecardresearch

प्राच्यविद्या अभ्यासाला आधुनिक माध्यमाचा साज; भांडारकर संस्थेतर्फे ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’ची निर्मिती; पारंपरिक ज्ञान जगभरातील अभ्यासकांना खुले

स्थापनेची शताब्दी पार केलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने कात टाकत आधुनिकतेची कास धरली आहे.

पारंपरिक ज्ञान जगभरातील अभ्यासकांना खुले

पुणे : प्राच्यविद्या क्षेत्रातील अभ्यास आणि संशोधनाला जागतिक स्तरावर नेण्याच्या उद्देशातून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’ची निर्मिती केली जात आहे. सी-डॅक आणि ज्ञानसा या संस्थांच्या सहकार्याने निर्मिती होत असलेले डिजिटल प्लॅटफॉर्म हे सी-डॅकच्या ‘क्लाउड’द्वारे उपलब्ध होत आहे. जगभरातील अभ्यासक आणि संशोधकांना दक्षिण आशियाई तत्त्वज्ञानासह पारंपरिक ज्ञानसाठा खुला करत भांडारकर संस्थेने प्राच्यविद्या अभ्यासकाला आधुनिक माध्यमाचा साज दिला आहे.

स्थापनेची शताब्दी पार केलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने कात टाकत आधुनिकतेची कास धरली आहे. पारंपरिक ज्ञानसाठा जगभरातील अभ्यासक आणि संशोधकांना खुले करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येत आहे. संस्थेतर्फे निर्मिती होत असलेला ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’ हा भारतातील पहिलाच प्रयोग असून मार्चअखेरीस कार्यान्वित होईल. त्यावर विनाशुल्क व्याख्याने, संस्थेचे विविध अभ्यासक्रम, अन्य विद्यापीठांचे अभ्यासक्रम, ग्रंथालय, प्रश्नोत्तरांचा स्वतंत्र विभाग असा ‘फोरसेरा’च्या धर्तीवर प्लॅटफॉर्म केला जात आहे, अशी माहिती भांडारकर संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी दिली. हा डिजिटल प्लॅटफॉर्म कार्यान्वित झाल्यानंतर वर्षभरात किमान एक कोटी लोक या प्लॅटफॉर्मला भेट देतील, असा अंदाज आहे, असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्लॅटफॉर्म निर्मितीसाठी पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी दानशूरांना आवाहन करण्यात आले आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये राकेश झुनझुनवाला यांनी २५ लाख रुपये आणि लंडन येथील डॉ. अनिल नेने यांनी पाच लाख रुपयांचे अर्थसा केले आहे. एम. आर. यार्दी सिस्टीम्सकडून ४० लाख रुपयांचे साह्य लवकरच प्राप्त होईल. सातत्याने नवीन ज्ञानाची भर पडत राहणार असल्याने डिजिटल प्लॅटफॉर्म हे निरंतर सुरू राहणारे काम आहे, याकडे पटवर्धन यांनी लक्ष वेधले.

डिजिटल प्लॅटफॉर्म असे असेल..

’ प्राच्यविद्येसह विविध विषयांमध्ये ज्ञान संपादन करू इच्छिणारे विद्यार्थी, अभ्यासक आणि संशोधकांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा फायदा होणार आहे.

’ प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात येणाऱ्या आशयसंपन्न ज्ञाननिर्मितीसाठी विद्वान अभ्यासकांना योग्य ते मानधन दिले जाणार आहे.

’ यापैकी काही अभ्यासक्रम सशुल्क असतील ज्याद्वारे संस्थेला उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होईल.

’ या अभ्यासक्रमाद्वारे मिळणारे पैसे हे पुन्हा आशयसंपन्न ज्ञाननिर्मितासाठी गुंतवणूक म्हणून उपयोगात आणले जाणार आहेत.

’ ज्ञानातून संपत्ती आणि ज्ञाननिर्मितीसाठी संपत्तीचा विनियोग याद्वारे डिजिटल अर्थसंरचना निर्माण होईल.

दक्षिण आशियाई  तत्त्वज्ञानाचे व्यासपीठ

रामायण, महाभारत, बौद्ध आणि जैन तत्त्वज्ञानाची निर्मिती आणि विकसित झालेल्या पारंपरिक ज्ञानासह हे प्लॅटफॉर्म दक्षिण आशियाई तत्त्वज्ञानाचे समग्र व्यासपीठ म्हणून कार्यरत राहील. केवळ प्राच्यविद्याच नाही, तर गायन, चित्र-शिल्प, नृत्य, नाटय़शास्त्र, विज्ञान, मानसशास्त्र, भूगोल असे विविध विषय त्या व्यासपीठावर एकावेळी असतील. पहिल्या वर्षी चारशे तास कालावधीचे ज्ञान त्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध (अपलोड) करून देण्यात येणार आहे, असे भूपाल पटवर्धन यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Equipping oriental studies with modern medium creating a digital platform akp

ताज्या बातम्या