पिंपरी : मुलाला पार्टीत घेण्यास नकार दिल्याने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली. यामध्ये मुलगा जखमी झाला. ही घटना गहुंजे येथील एका सोसायटीमध्ये सोमवारी घडली. किशोर छबुराव भेगडे (वय ५१) असे अटक केलेल्या उपनगराध्यक्षाचे नाव आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी मारहाण झालेल्या मुलाच्या आईने शिरगाव-परंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांची दोन मुले आणि त्यांच्या वर्गातील अन्य मुले यांची गहुंजे येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील क्लब हाऊसमध्ये पार्टी होती. या पार्टीमध्ये भेगडे याच्या १४ वर्षीय मुलाला येण्यास नकार देण्यात आला. त्यावरून संतापलेल्या भेगडे याने मुलाला पार्टीत येण्यासाठी नकार देणाऱ्या दोन्ही मुलांना क्लब हाऊसमधून बाहेर पडण्यास मज्जाव केला आणि त्यांना मारहाण केली.
मी कोण आहे, तुला माहिती नाही, तुझ्या बापाला बोलव, तुला आज जिवंत ठेवत नाही’, अशी दमबाजी केली. फिर्यादीच्या मुलाच्या छाती, पोटावर बुक्क्यांनी अनेकदा जोरदार प्रहार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये मुलगा जखमी झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी सांगितले. किशोर भेगडेला अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत, असे पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी सांगितले.