पुणे : राज्यात ३१ जुलै २०२२पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ आणि निवड श्रेणीस पात्र शिक्षक, मुख्याध्यापकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. या निर्णयाचा राज्यभरातील सेवानिवृत्त शिक्षकांना फायदा मिळणार आहे. राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, अध्यापक महाविद्यालयातील शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणी प्रशिक्षण लागू आहे. त्यात दहा दिवस किंवा ५० घड्याळी तासांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत २०२१मध्ये निर्णय घेण्यात आला.

प्रशिक्षण सुरू करण्याचा अंदाजित कालावधी लक्षात घेऊन ३१ ऑक्टोबर २०२१पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या किंवा त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीतून सवलत देण्यात आली होती. हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापकांना लागू करण्यात आला. मात्र प्रशिक्षण कार्यक्रम विकसित झाल्यानंतर १ जून २०२२पासून प्रशिक्षण सुरू करण्यात आल्याने प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळण्यास ४५ दिवसांचा अवधी देण्यात आला होता.

हेही वाचा >>> Teachers Day 2023: शिक्षक दिनाची भेट! १ हजार २३५ शिक्षकांना ‘धन्वंतरी’चा लाभ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे वरिष्ठ आणि निवड श्रेणीस पात्र शिक्षकांना ३१ मे २०२२पर्यंत, ३१ जुलै २०२२ अखेर सेवानिवृत्त शिक्षकांना सेवांतर्गत  प्रशिक्षणाची संधी मिळाली नाही. या पार्श्वभूमीवर शासन स्तरावरून प्रशिक्षणाचे आयोजन न झाल्याने, प्रशिक्षणाची संधी उपलब्ध न झाल्याने प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीतून सवलत देण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता ३१ जुलै २०२२पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ आणि निवडश्रेणी पात्र शिक्षक, मुख्याध्यापकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीतून सवलत देण्यात येत असल्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला.