पुणे : ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या शब्दविरहित हास्यचित्रांच्या सात दशकांच्या कारकिर्दीला ‘सलाम हसऱ्या रेषांना’ या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाद्वारे अभिवादन करण्यात येणार आहे. ‘कार्टूनिस्टस् कम्बाइन’ ही मराठी व्यंगचित्रकारांची संघटना आणि गंगोत्री होम्स ॲन्ड हॉलिडेज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारपासून (२९ जुलै) भरविण्यात येणाऱ्या तीन दिवसांच्या व्यंगचित्र प्रदर्शनात महाराष्ट्रातील सत्तरहून अधिक मराठी व्यंगचित्रकारांची शब्दविरहित हास्यचित्रे रसिकांना पाहावयास मि‌ळणार आहेत. व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही या प्रदर्शनात सहभाग असणार आहे.

बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात येणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते शुक्रवारी सायंका‌ळी साडेपाच वाजता होणार आहे. त्यानंतर प्रभावळकर आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांची मुलाखत घेणार आहेत. या कार्यक्रमात शि. द. फडणीस यांच्या व्यंगचित्रांवर आधारित काही ॲनिमेशन फिल्म्सही दाखवण्यात येणार आहेत. प्रदर्शनाच्या निमित्ताने ‘तुमचे व्यंगचित्र तुमच्या समोर’ हा अनोखा उपक्रम तीन दिवस राबविला जाणार आहे, अशी माहिती ‘कार्टूनिस्टस् कम्बाइन‘चे माजी अध्यक्ष चारुहास पंडित आणि गंगोत्री होम्स ॲन्ड हॉलिडेजचे संचालक मकरंद केळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. संघटनेचे सचिव योगेंद्र भगत, राजेंद्र आवटे, शि. द. फडणीस यांच्या कन्या रूपा देवधर या वेळी उपस्थित होत्या.  

प्रदर्शनातील महत्त्वाचे कार्यक्रम

शनिवार (३० जुलै) : ‘मिशन ॲनिमेशन’ या कार्यक्रमात शि. द. फडणीस यांच्या हास्यचित्रांना सचेत करण्याचा नावीन्यपूर्ण अनुभव, सादरकर्ते – डॉ. समीर सहस्रबुद्धे, कौमुदी सहस्रबुद्धे (दुपारी २) 

व्यंगचित्रविषयक कार्यशाळा, ‘कशी असते डिजिटल रेषा’ या अंतर्गत व्यंगचित्रकलेच्या प्राथमिक माहितीपासून ते संगणकाचा वापर येथपर्यंत विविध बारकाव्यांबद्दल प्रात्यक्षिकांसह माहिती (दुपारी ३)

व्यंगचित्र : कला, कल्पना आणि संधी या विषयावर चर्चा, सहभाग – ज्ञानेश सोनार, संजय मिस्त्री, चारुहास पंडित (सायं. ५) 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवार (३१ जुलै) : व्यंगचित्रांत ‘वेगळा विचार करताना’ या विषयी चर्चा (दुपारी २) भाषा रेषांची : सहभाग – विजय पराडकर, (सायं. ४.३०)