पुणे: निगडी आणि रावेत येथील नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत सुलभ प्रवास करता यावा, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) दोन बस मार्गिकांचा विस्तार केला आहे.
सदुंबरे सिद्धांत महाविद्यालय ते निगडी आणि समीर लॉन्स रावेत ते निगडी या दोन मार्गिकांवरील बस आता पिंपरी रस्त्यावरील आंबेडकर चौकापर्यंत धावणार आहे. यामुळे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) प्रवाशांमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे.
सदुंबरे सिद्धांत कॉलेज ते निगडीपर्यंतच्या मार्गावर दोन बस आणि समीर लॉन्स रावेत ते निगडी या मार्गावर सहा अशा आठ बस आंबेडकर चौकापर्यंत धावणार आहेत. पिंपरी येथे मेट्रोचे स्थानक असून भक्ती-शक्तीपर्यंत मेट्रो मार्गिकेचा विस्तार होणार आहे. पीएमपीने दोन्ही मार्गांचा पिंपरीपर्यंत विस्तार केल्याने मेट्रो स्थानकांवर सहज पोहोचता येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सदुंबरे आणि रावेत परिसरातील नागरिकांना पिंपरीमध्ये जाण्यासाठी ‘पीएमपी’ची थेट सेवा नसल्याने नोकरदार, आयटी कंपनीतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. दोन मार्गांचा पिंपरी मेट्रो स्थानकापर्यंत विस्तार केल्याने प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. – नितीन नार्वेकर,सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल