पुणे : जीवाणू आणि बुरशी संसर्गावर औषधे प्रभावी ठरत नाहीत, त्यावेळी प्रतिजैविक प्रतिरोधाची स्थिती उद्भवते. देशात प्रतिजैविक प्रतिरोधामुळे मूत्रमार्ग संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे, असे मत तज्ज्ञांनी पुण्यात आयोजित १३ व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय बेस्ट ऑफ ब्रुसेल्स परिषदेत व्यक्त केले. प्रतिजैविकांच्या अतिरेकी वापरावर मर्यादा आणण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आला.
आंतरराष्ट्रीय बेस्ट ऑफ ब्रुसेल्स परिषदेत तज्ज्ञांनी देशातील मूत्रमार्ग संसर्ग आणि प्रतिजैविक प्रतिरोधाच्या वाढत्या प्रमाणावर चर्चा केली. प्रभावी उपचार पर्यायांची आवश्यकताही त्यांनी अधोरेखित केली. यावेळी देशातील वाढत्या मूत्रमार्ग संसर्गाबाबत परिषदेचे आयोजन अध्यक्ष डॉ. शिरीष प्रयाग म्हणाले, की मूत्रमार्ग संसर्ग हा देशातील सर्वात सामान्य जीवाणू संसर्ग आहे.
गुंतागुंतीच्या मूत्रमार्गाच्या संसर्गासाठी ई-कोलाय आणि क्लेब्सिएला न्यूमोनिया ही सर्वात सामान्य कारणे आहेत. गंभीर मूत्रमार्गाच्या संसर्ग असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, अतिदक्षता विभागात दाखल करावे लागण्यासह आणि कधीकधी व्हेंटिलेशनची आवश्यकता भासते. प्रतिजैविक प्रतिरोधाच्या वाढत्या प्रमाणामुळ गंभीर मूत्रमार्ग संसर्गावर उपचार करणे आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे रुग्णाला जास्त काळ रुग्णालयात राहावे लागत आहे.
परिषदेचे आयोजन सचिव डॉ. सुभल दीक्षित म्हणाले, की वाढत्या प्रतिजैविक प्रतिरोधामुळे उपचार गुंतागुंतीचे होतात. रुग्णाला गरज असेल तरच प्रतिजैविकांचा वापर करावा. अनेक रुग्णालयांमध्ये याबाबत जागरूकता कार्यक्रम राबविले जात आहेत. याबरोबरच प्रशिक्षण कार्यक्रमही आवश्यक आहेत. प्रतिजैविकांचा वापर नेहमी काळजीपूर्वक करायला हवा.
संशोधनाची आवश्यकता
मेदांता इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर अँड अॅनेस्थेसियोलॉजी संस्थेचे संचालक (क्रिटिकल केअर मेडिसिन) डॉ. दीपक गोविल म्हणाले, की प्रतिजैविक प्रतिरोधाच्या वाढीला तोंड देण्यासाठी तसेच गंभीर मूत्रमार्ग संसर्गाच्या वाढत्या प्रसाराला तोंड देण्यासाठी संशोधन करण्याची आवश्यकता आहे. यातून प्रतिजैविकांची नवीन उपचार पद्धती विकसित करता येईल. देशात मूत्रमार्ग संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी जागरूकता वाढविणे, नवीन उपचार पर्याय, स्वच्छता सुधारणे आणि प्रतिजैविक प्रतिरोधक समस्येचे निराकरण करणे, या बाबी महत्वाच्या आहेत.