पुणे : साखर आयुक्तालयाने राज्यातील कारखानानिहाय ऊसतोडणी आणि वाहतूक खर्च जाहीर केला आहे. त्यामुळे रास्त आणि किफायतशीर दरातून (एफआरपी) होणाऱ्या वजावटीत पारदर्शकता येणार आहे. शेतकऱ्यांनाही आपल्या ऊस बिलातून किती वजावट होते, याचा अंदाज घेऊन कोणत्या कारखान्याला ऊस गाळपासाठी द्यायचा, याचा निर्णय घेता येणार आहे.
या बाबत माहिती देताना साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, शेतकरी संघटना आणि शेतकरी अनेकदा ऊसतोडणी आणि वाहतूक खर्चाबाबत शंका उपस्थित करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या ऊस बिलातून किती वजावट होते. याची माहिती मिळावी. एखाद्या कारखान्यांची वजावट जास्त असेल, तर पर्यायी कारखान्याला ऊस घालता येणार आहे किंवा शेतकरी स्वत: ऊसतोडणी करून आपला ऊस कारखान्याला नेऊन घालू शकतात. एकूण ऊस बिलाबाबत पारदर्शक व्यवहार होण्यासाठी आयुक्तालयाने जाहीर केलेली कारखानानिहाय ऊसतोडणी आणि वाहतूक खर्च उपयोगी ठरणार आहे.
असा ठरतो तोडणी, वाहतूक खर्च
कारखान्यांच्या परिघात उसाचे क्षेत्र जास्त असेल, तर वाहूतक खर्च कमी येतो. मुळात ऊसतोडणी खर्चात फारसा फरक येत नाही. मात्र, वाहतूक खर्चात कारखानानिहाय जास्त फरक दिसून येतो. सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र जास्त आहे. कारखान्यांच्या पाच ते दहा किलोमीटर परिघातीलच ऊस अनेक कारखान्यांना संपत नाही. त्यामुळे या जिल्ह्यांत वजावट कमी असते. याच्या उलट मराठवाडा आणि विदर्भात उसाचे क्षेत्र कमी असते. कारखान्यांना पुरेसा ऊस मिळण्यासाठी सुमारे ४०- ५० किलोमीटर अंतरावरून ऊस आणावा लागतो, त्यामुळे या कारखान्यांना वाहतुकीवर जास्त खर्च करावा लागतो.
हुतात्मा कारखान्यांची वजावट सर्वांत कमी
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नाईकवडी हुतात्मा किसन आहिर सहकारी साखर कारखाना, वाळवा या कारखान्यांचा तोडणी आणि वाहतूक खर्च सर्वांत कमी म्हणजे ५७१.६४ रुपये इतका आहे. सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापुरातील कारखान्यांची ही वजावट सरासरी ७५० ते ८०० रुपये आहे. हीच वजावट मराठवाडा आणि विदर्भात हजार रुपयांपर्यंत आहे. सर्वांत जास्त तोडणी आणि वाहतूक खर्च ११०९ रुपये नाशिक जिल्ह्यातील धाराशिव शुगर लि. (ता. कळवण) या कारखान्याचा आहे.
उसाच्या एफआरपीतून होणाऱ्या वजावटीत पारदर्शकता येणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या बिलातून किती वजावट झाली, याची माहिती मिळणार आहे. कमी वजावट असलेल्या कारखान्यांना ऊस घालण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना असणार आहे. वजावट रक्कम जास्त असेल, तर शेतकरी स्वत: ऊसतोडणी करून आपला ऊस कारखान्यांना घालू शकतात. – शेखर गायकवाड, साखर आयुक्त