पुणे : पादत्राणे निर्मिती करणाऱ्या नामवंत कंपनीच्या नावे बनावट पादत्राणांची विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार दिवाळीमध्ये उघडकीस आला. कंपनीतील अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर रास्ता पेठेतील पादत्राणे विक्री करणाऱ्या तीन दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

या कारवाईत एक लाख दहा हजार रुपयांचे बनावट पादत्राणे जप्त करण्यात आले. या प्रकरणी पादत्राणे विक्री करणाऱ्या तीन दुकानदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत पादत्राणे निर्मिती करणाऱ्या कंपनीतील स्वामित्व हक्क विभागाची जबाबदारी सांभाळणारे अधिकारी निखिल पाटील यांनी समर्थ पाेलीस ठाण्यात दिली आहे.

रास्ता पेठेत पादत्राणे विक्रीची दुकाने आहेत. घाऊक, तसेच किरकोळ स्वरुपात या भागात पादत्राणे विक्रीचा व्यवसाय केला जातो. या भागातील तीन पादत्राणे विक्री करणारे दुकान पादत्राणे निर्मिती करणाऱ्या नामवंत कंपनीच्या नावे बनावट पादत्राणांची विक्री करत असल्याची माहिती पाटील यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती समर्थ पोलिसांना दिली.

पोलिसांनी तीन दुकानांवर कारवाई करुन तेथून एक लाख दहा हजार रुपयांचे पादत्राणे जप्त केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, गुन्हे शाखेचे निरीक्षक चेतन माेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे तपास करत आहेत.

सणासुदीच्या काळात नामवंत कपडे, पादत्राणे निर्मिती करणाऱ्या उत्पादकांच्या नावे बनावट उत्पादनांची विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. नामवंत उत्पादकांच्या बनावट मालाची विक्री करुन ग्राहकांची फसवणूक करण्यात येते. नामवंत उत्पादनांच्या बनावटे उत्पादनांची स्वस्तात विक्री केली जाते.

बनावट टी शर्ट, जीन, पादत्राणे परराज्यातून पुणे, मुंबईतील बाजारपेठेत विक्रीस पाठविली जातात. यापूर्वी पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील दुकानदारांविरुद्ध कारवाई केली होती. नामवंत कंपन्यांच्या नावे तयार करण्यात आलेला लाखो रुपयांची बनावट उत्पादने पोलिसांनी जप्त केली होती.