कपडे, पादत्राणांसह विविध वस्तू ‘ब्रॅण्डेड’ खरेदी करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या अनेकांना आजही ‘ब्रॅण्डेड’ कपडे, पादत्राणांचा मोह वाटतो. मात्र, खिशाचे गणित जुळत नसल्याने अनेक जण त्या मोहावर पाणी सोडतात. गेल्या चार ते पाच वर्षांपासून परदेशातील नामवंत उत्पादकांचे कपडे, पादत्राणे अगदी स्वस्तात मिळत असल्याने अनेकांनी खरेदीस प्राधान्य दिले. मात्र, चकचकीत दालनांत मांडलेली उत्पादने बनावट असल्याची जाणीवही अनेकांंना नाही. ‘ब्रॅण्डेड’च्या नावाखाली बनावट उत्पादनांची विक्री होत असल्याचा प्रकार पुणे पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगाराच्या संधीमुळे अनेक जण शहरात स्थायिक झाले आहेत. एके काळी शहरातील कपडे, पादत्राणांची मुख्य बाजारपेठ म्हणून लक्ष्मी रस्ता आणि लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता (एम. जी. रोड) ओळखला जायचा. एम. जी. रस्त्यावरील वस्त्रदालनांत शक्यतो मध्यमवर्गीय ग्राहक जायचा नाही. उच्च मध्यमवर्गीय, धनिक वर्गातील ग्राहक तेथे जायचे. लष्कर भागातील फॅशन स्ट्रीट परिसरात सामान्यांना परवडणारे कपडे मिळायचे. मात्र, एम.जी. रस्ता परिसरातील वस्त्रदालनात एकदा तरी खरेदी करायची, अशी अनेकांची इच्छा असायची. गेल्या दहा वर्षांत शहरातील पारंपरिक बाजारपेठेचे स्वरूप पालटले. परदेशातील अनेक नामवंत उत्पादकांनी शहर, तसेच उपनगरांत त्यांची दालने सुरू केली. खरेदीवर सूट देण्यात आल्याने ग्राहकांची पावले तिकडे वळाली. मात्र, मध्यमवर्गीयांकडून असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन गल्लोगल्ली कपडे, पादत्राणे विक्रीची दालने सुरू करण्यात आली. त्यामुळे की काय गेल्या दहा वर्षांत टिळक रस्ता कपडे विक्रीची मोठी बाजारपेठ म्हणून लोकप्रिय झाला.

हेही वाचा – बांधकाम व्यावसायिकांवर का होणार कारवाई?

परदेशातील नामवंत वस्त्रनिर्मिती, पादत्राणे, तसेच अन्य उत्पादने अगदी स्वस्तात मिळू लागली. विक्रेत्यांनी खरेदीवर ७० टक्क्यांपर्यंत सूट दिल्याने ग्राहकही आनंदी झाले. मात्र, नामवंत उत्पादकांच्या नावे बनावट मालाची विक्री सर्रास सुरू झाली. गल्लोगल्ली परदेशातील नामवंत ब्रॅण्ड स्वस्तात मिळू लागले. कंपनीचे बोधचिन्ह (लोगो) वापरून बनावट मालाची विक्री होत असल्याच्या तक्रारी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे करण्यात आल्या. हुबेहूब बनावट माल स्वस्तात उपलब्ध झाल्याने नामांकित उत्पादकांच्या काॅपीराइट विभागाने पोलिसांकडे रीतसर तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर आठवडाभरात पुणे पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागांत छापे टाकून नामवंत उत्पादकांच्या नावे तयार करण्यात आलेले लाखो रुपयांचे कपडे, पादत्राणे जप्त केली.

दिवाळीत बनावट मालाची उच्चांकी विक्री झाली. स्वस्तात कपडे, पादत्राणे उपलब्ध झाले आणि त्यावर सवलतींचा भरघोस वर्षाव करण्यात आला हाेता. बनावट मालाची सर्वाधिक विक्री दिवाळीत झाली. पंजाबमधील लुधियाना येथे नामांकित कंपन्यांचे बनावट कपडे तयार करून देशभरात विक्रीस पाठविले जातात. देशभरात पोेलिसांनी केलेल्या कारवाईतून हे उघडकीस आले आहे. लुधियानात नामवंत उत्पादकांच्या नावे कपडे तयार करणारे उत्पादक आहेत. तेथून बनावट कपडे, पादत्राणे पुणे, मुंबई, तसेच दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरूतील बाजारपेठेत विक्रीस पाठविले जातात. हुबेहूब कपडे आणि पादत्राणे तयार करण्यासाठी चीनमधून कच्चा माल मागविण्यात येतो, अशी माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – पुनर्विवाहाच्या आमिषाने कर्वेनगर भागातील ज्येष्ठाची फसवणूक, ज्येष्ठाला जाळ्यात ओढून पोलीस कारवाईची धमकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बनावट मालाची बाजारपेठ मोठी आहे. स्वस्तात नामवंत उत्पादने मिळत असल्याने तरुणाईची पावले वळतात. भरघोस सूट दिल्याने खरेदीची लयलूट होते. मात्र, बनावट माल माथी मारण्यात आल्याची जाणीवही अनेकांना नसते. बनावट मालाची निर्मिती, विक्रीवर बारकाईने नजर ठेवणे हे नामवंत उत्पादकांच्या काॅपीराइट विभागाच्या आवाक्याबाहेर आहे.

rahul.khaladkar@expressindia.com