पुणे : ज्येष्ठ अभिनेते राम नगरकर यांच्या ‘रामनगरी’ या एकपात्री प्रयोगाची परंपरा पुढे नेणारे प्रसिद्ध एकपात्री कलाकार वंदन राम नगरकर (वय ६१) यांचे मंगळवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी डाॅ. वैजयंती आणि कन्या विनिषा असा परिवार आहे.
गेल्या वर्षभरापासून वंदन नगरकर फुफ्फुसाच्या संसर्गाने त्रस्त होते. चेन्नई येथील रुग्णालयात उपचार घेऊन ते पुण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर रात्री वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी (२४ मार्च) त्यांचा वाढदिवस साजरा होणार होता. पण, त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
हेही वाचा – पुणे : शहरासह जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांचे कामकाज पूर्ववत
टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल आणि नंतर अभिनव कला महाविद्यालय येथून शिक्षण घेतलेले वंदन नगरकर गेल्या काही वर्षांपासून व्यक्तिमत्त्व विकास आणि कॉर्पोरेट ट्रेनर या क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत होते. राम नगरकर यांच्या निधनानंतर वंदन यांच्यातील कलागुण ओळखून दिवंगत अभिनेते निळू फुले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे वंदन यांनी रामनगरी हा कार्यक्रम रंगभूमीवर सादर केला आणि त्याचे अनेक प्रयोगही केले. सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांच्यासमवेत ते ‘मालक नको, पालक व्हा’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करत असत.
हेही वाचा – पुण : महावितरणचा थकबाकीदारांना ‘झटका’; ४० हजारांहून अधिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
कॉर्पोरेट क्षेत्रात प्रशिक्षकाच्या भूमिकेतून त्यांनी विद्यार्थापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत दोन हजार कार्यशाळा घेतल्या होत्या. ‘भाषणाचे प्रभावी तंत्र’, ‘भरारी यशाची’, ‘टर्निंग पॉईंट’, ‘पालकांचे चुकते कुठे?’, ‘प्रभावी इंटर टेक्निक्स’ अशा मराठी आणि ‘स्पिक विथ कॉन्फिडन्स’ या इंग्रजी अशा सहा पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते. राम नगरकर कला अकादमीचे अध्यक्ष असलेल्या वंदन नगरकर यांनी एकपात्री कलाकार संघटनेचे अध्यक्षपद भूषविले होते.